Belagavi

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हॅक्सिन डेपोत साकारणार मनोरंजन क्लब

Share

बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील लोक कल्याणकारी अनोखे प्रकल्प राबविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना काही क्षण विरंगुळा मिळण्यासाठी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपोत मनोरंजन क्लब साकारण्यात येणार आहे. या संदर्भात सल्ला-मसलतीसाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक घेतली.

बेळगाव दक्षिण मतदार संघात विकासाचे पर्व सुरु करणाऱ्या आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून आता बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपोमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रिक्रिएशन क्लब साकारणार आहे. बेळगावचे फुफ्फुसं समजल्या जाणाऱ्या निसर्गसंपन्न, हिरवाईने नटलेल्या शांत ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे. या संदर्भात त्यांच्या सूचना आणि सल्ले घेण्यासाठी आ. अभय पाटील यांनी आज व्हॅक्सिन डेपोत बैठक घेतली. या नव्या अनोख्या प्रकल्पाबाबत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अनोखा प्रकल्प साकारण्याचे आपले स्वप्न आहे. व्यवसाय-सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या प्रसन्न वेळी काही क्षण मनोरंजनात, निवांतपणात घालवून नवी ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा विचार यामागे आहे. सिनिअर सिटीझन रिक्रिएशन प्रकल्पात 2 मोठ्या हॉलमध्ये रिडींग रूम असतील. तेथे ऑनलाईन आणि ऑफलाईन वाचनाची सोय असेल. मराठी, कन्नड, हिंदी आदी सर्व भाषांतील सुमारे 10 हजार पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन वाचनासाठी 10 संगणक उपलब्ध करण्यात येतील. एक ओपन एअर जिम तयार करून तेथे दोन तासांत किमान 200 लोकांना व्यायाम करता येईल अशी सोय करण्यात येईल. 2 टेबल टेनिस कोर्ट, बिलिअर्डस, स्क्वॅश खेळण्याची सोय असेल. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र बसून गप्पा ठोकण्यासाठी 5 कट्टे बांधण्यात येणार आहेत. एक संगीत कक्ष उभारून तबला, माऊथ ऑर्गन, गिटार अशी वाद्ये उपलब्ध करून देण्यात येतील. गरजेनुसार संगीतवाद्यांची संख्या वाढविण्यात येईल. त्याशिवाय ध्यानधारणा करू इच्छणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ध्यानमंदिरही बांधण्यात येईल असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक मनोरंजन क्लबमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे सांगून आ. अभय पाटील पुढे म्हणाले, या ठिकाणी किमान 50 लोक एकत्र बसू शकतील अशा क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तेथे महिन्यातून एकदा नाटक, हास्योत्सव तसेच ब्लड शुगर व ब्लड प्रेशर तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. प्रारंभी सरकारतर्फे याचे व्यवस्थापन करण्यात येईल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ही जबाबदारी सोपविण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या प्रसन्न वेळी काही तास निवांतपणे अनुभवून दिवसभराची सकारात्मक ऊर्जा प्राप्त करता यावी यासाठी हा प्रकल्प उभारण्याचे आम्ही निश्चित केले आहे. या संदर्भात काही सल्ले, सूचना द्यायच्या असतील तर त्या द्याव्यात, त्यांचे स्वागत आहे. त्यावर निश्चित कार्यवाही केली जाईल असे आवाहन आ. अभय पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले.

आ. अभय पाटील यांच्या या संकल्पनेचे उपस्थित सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. यावेळी बोलताना एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, आ. अभय पाटील यांनी मांडलेली ही संकल्पना अतिशय स्वागतार्ह आणि कालानुरूप आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात जनतेच्या अपेक्षा ओळखून विकासाचे अनेक प्रकल्प राबविले आहेत. त्याच धर्तीचा हा प्रकल्प आहे. कारगिल योध्यांच्या स्मरणार्थ त्यांनी व्हॅक्सिन डेपोतच 400 झाडे लावली. विकासाचे नवे पर्व त्यांनी सुरु केले आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून भूमिका घेण्याची सवय काही हितशत्रूंनी बेळगावकरांना लावली आहे. ती चुकीची असून ती सोडून देऊन विकासाच्या संकल्पनांचे आपण स्वागत केले पाहिजे.

अन्य एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, आ. अभय पाटील यांनी मतदार संघात अनेक उद्यानाचा विकास करून स्थानिक नागरिकांना वायुविहार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक ठिकाणी सुसज्जित ग्रंथालये उभारून वाचनाची सोय केली आहे. आता व्हॅक्सिन डेपोत ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन क्लब सुरु करण्याची त्यांची संकल्पना स्वागतार्ह आहे. याचे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक स्वागत करतो. या प्रकल्पाच्या यशासाठी आम्ही सर्व सहकार्य देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी अनेक विधायक सूचना केल्या. बैठकीला दौलत शिंदे, वसंत हेब्बाळकर, सुनील होंडद, शरद कुलकर्णी, शंकर महागावकर, डी. पी. कुलकर्णी, चिदंबर अरसंग, अनंत जोशी, एन. जी. जांबोटकर, ए. एन. अष्टेकर, संभाजी देसाई, बसवराज मोटगी, किरण पाटील, राजू राठी, सचिन भोसले, दयानंद कित्तूर आदी उपस्थित होते.

Tags: