लिंगायत पंचमसाली समाजाला २-ए आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 50 दिवसांपासून बसवमृत्युंजय महास्वामी बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये सत्याग्रह करत आहेत. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील पंचमसाली समाजाच्या नेत्यांनी आज राष्ट्रीय व राज्य महामार्ग व जिल्ह्यातील प्रमुख मार्ग रोखून निदर्शने केली.
आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात, असे म्हणत पंचमसाली समाजाच्या शेकडो लोकांनी हत्तरगी टोल गेटजवळ राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा मानद अध्यक्ष आर. के. पाटील म्हणाले की, जयमृत्युंजय महास्वामी बेंगळुरमध्ये लढत असून त्यांच्या समर्थनार्थ आम्ही राज्यभर महामार्ग रोखून राज्य सरकारवर दबाव आणत आहोत.
बेळगाव जिल्हा युवक संघाचे अध्यक्ष शिवनगौडा पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आपण कुडाल संगम जयमृत्युंजय महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली पंचमसाली आरक्षणासाठी लढत आहोत. मात्र राज्य सरकार आपल्याला केवळ खोटी आश्वासने देऊन सावत्र आईसारखे वागत आहे.
यमकनमर्डीचे नेते रवी जिंद्राळी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आईची शपथ घेऊन आमची फसवणूक केली आहे, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढू, असे ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री शशिकांत नाईक, इरण्णा बिसिरोट्टी, रवींद्र जिंद्राळी, महांतेश मगदुम, अनिल पाटील, वृषभ पाटील, भीमप्पा चौगला, गविश रवदी, सुभाष नाईक आदी उपस्थित होते.


Recent Comments