भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून बेळगाव महानगर पालिकेतर्फे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हाताळणीसंदर्भात जनजागृती मोहीम सुरु करण्यात आलीय. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याहस्ते अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बेळगावातील सीबीटी स्थानकावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
नव्याने मतदान करणारे आणि एकंदर सर्व वयोगटातील मतदारांना ईव्हीएम मशीनने मतदान करणे, आपणाला हव्या त्या पक्षाच्या, हव्या त्या उमेदवाराला मतदान झालेय की नाही याची खातरजमा करणे आदींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्याची मोहीम बेळगाव मनपाने आजपासून हाती घेतली. बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानकावर (सीबीटी) जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षद बोयेल, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मोहिमेला चालना देण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बेळगाव मनपातर्फे ईव्हीएम वापर जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. यात ईव्हीएमच्या सहाय्याने सहज मतदान कसे करावे, आपण दिलेले मत आपल्याला हव्या त्या उमेदवाराला गेले की नाही याची खातरजमा करणे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येत आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी त्याचा सदुपयोग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय “तुमचा पोलिंग बूथ जाणून घ्या” हा उपक्रमसुद्धा राबविण्यात येत आहे.
यात ज्या बुथवर मतदारांचे मतदान आहे त्यांची माहिती बूथ स्तरीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येईल. ज्या-ज्या बुथवर कमी मतदान झाले आहे तेथे मतदारांमध्ये जागृती अभियान राबवून मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न अधिकारी करतील. यासाठी मनपाच्या एलईडी फलकांद्वारे जागृती करण्यात येईल. जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली असून, ज्यांची नावे त्या यादीत नाहीत, त्यांना नावे समाविष्ट करण्यासाठी अजून आठवड्याची मुदत असल्याने अशांनी फॉर्म नं. 6 भरून देऊन आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावीत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हा पंचायत सीईओ हर्षद बोयेल म्हणाले, प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांमध्ये ऐन मतदानावेळी गोंधळ उडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना या मोहिमेंतर्गत मतदानाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा नवीन मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनीही मार्गदर्शन केले. सीबीटीवर आलेल्या महिला-पुरुष प्रवाशांना यावेळी ईव्हीएमद्वारे मतदान कसे करावे, आपल्याला हव्या त्या उमेदवारालाच मतदान झाले की नाही याची खातरजमा करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बेळगाव मनपाचे आणि जिल्हा प्रशासन, निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments