उपकारांची जाणीव न ठेवणाऱ्या ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर कैकयी; खोटारडेपणाचा दुसरे नाव आहेत अशी घणाघाती टीका माजी आमदार व भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली.

पंत बाळेकुंद्रीत नुकत्याच झालेल्या काँग्रेस प्रजाध्वनी यात्रेत आ. हेब्बाळकर यांनी संजय पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देताना संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांच्यावर तुफान हल्ला चढवला. भारतात लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, जिजाऊ, राणी चन्नम्मा अशा देवता, वीर नारींची पूजा केली जाते. पण कैकयीची पूजा कोण करत नाहीत. हेब्बाळकर तशा कैकयी आहेत, खोटारडेपणा, फसवणुकीचे दुसरे नाव म्हणजे आ. हेब्बाळकर असे ते म्हणाले. राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमदार निधीतुन पैसे का दिले नाहीत या हेब्बाळकर यांच्या सवालावर संजय पाटील म्हणाले, आमदार होऊनही हेब्बाळकर यांना कायद्यांची, आमदार निधीच्या नियमांची माहिती नाही. मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत पत्र लिहून विचारणा केली होती. त्यावर या कामासाठी निधी देण्याची तरतूद नसल्याने तो देता येणार नसल्याचे लेखी उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले असून ते आजही माझ्या संग्रही आहे. याबाबत हेब्बाळकरांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अभ्यास करावा असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. राजहंस गडावर त्यांच्या पुतळ्यासाठी मी स्वतः आधीपासून प्रयत्न केले आहेत. गडावरील माती आम्ही विकून खाल्ली हा हेब्बाळकरांचा आरोप तद्दन खोटा आहे. उलट पुतळा बसविण्याचे काम लवकर पूर्ण करावे यासाठी मी स्वतः कागदोपत्रांसह सरकारकडे पाठपुरावा केला आहे. हे खोटे सिद्ध झाल्यास राजकारण कायमचे सोडेन असे त्यांनी सांगितले. 40 लाख रुपये द्या, मी काँग्रेसमध्ये येतो असे नागेश मन्नोळकर यांनी आपल्या घरी येऊन सांगितले होते असा आरोप हेब्बाळकरांनी केला होता, त्याचा संदर्भ देत संजय पाटील म्हणाले, 20 वर्षांपूर्वी गोमटेश शिक्षण संस्थेतील माझ्या कार्यालयात येऊन 2 तास बसून 50 हजार हातउसने घेऊन गेलेल्या हेब्बाळकरांनी अजूनही ते पैसे परत केले नाहीत किंवा त्याबाबत अवाक्षरही काढले नाही. एवढी बिकट परिस्थिती काही वर्षांपूर्वी असलेल्या हेब्बाळकर आज 500 कोटींच्या मालकीण कशा झाल्या?, त्यांनी घेतलेले पैसे करत करावेत इतकी संजय पाटलांची परिस्थिती वाईट झालेली नाही, देवाने 2 नंबरचा व्यवसाय करण्याची वेळ येऊ दिलेली नाही. माझ्याकडून 50 हजार हातउसने घेतल्याचे खोटे आहे अशी शपथ त्यांनी मळेकरणी किंवा कोणत्याही देवापुढे घ्यावी असे आव्हान संजय पाटील यांनी दिले.
मी मुख्यमंत्री असताना संजय पाटील यांनी आमदार म्हणून शिवपुतळ्यासाठी निधी मागितला नाही, मागितला असता तर दिला असता असा आरोप सिद्दरामय्या यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना संजय पाटील म्हणाले, शिवपुतळा प्रतिष्ठापनेसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निधीची मागणी केली होती. त्यावर सिद्दरामय्या यांच्या सचिवांनी, परीक्षण करून निर्णय घेण्याचे आश्वासन देणारे लेखी पत्र दिले आहे. मग निधी मागितला नाही असे कसे म्हणता येईल असे सांगत त्या पत्राची प्रत सादर केली. सिद्दरामय्या यांना विसरण्याची सवय लागली आहे. निवडून दिलेल्या बदामीच्या मतदारांना ते विसरतात. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करतो. पण स्वतःच्याच पक्षाच्या व्यासपीठावर बोलताना त्याना आपला पक्ष कपँट याचा विसर पडतो. या देशातून काँग्रेसला हाकलून लावा असे आवाहन ते भर सभेत करतात. मग मी निधी मागितलेले त्यांच्या कसे लक्षात राहील? असा टोला संजय पाटील यांनी हाणला.
आ. हेब्बाळकर यांचे आणि रमेश जारकीहोळी यांचे वीस वर्षे खूप चांगले, जवळचे संबंध होते. रमेश जारकीहोळी यांचे बोट पकडूनच त्या आमदार झाल्या. अन्यथा ग्रामपंचायत सदस्य होण्याची पात्रता, क्षमताही त्यांच्यात नव्हती अशी जहरी टीका संजय पाटील यांनी केली. सतीश जारकीहोळी आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते म्हणून आ. हेब्बाळकर सांगत फिरतात. पण त्यांना पराभूत करण्यासाठी हेब्बाळकरांनी गुप्त बैठक घेतली. वेळ आली की, सविस्तर सांगेन असे संजय पाटील म्हणाले. आ. हेब्बाळकर महिला असल्याचा गैरफायदा घेतात. प्रत्येक गोष्टीला, यांना लाज वाटली पाहिजे असे बोलतात. लाज वाटण्यासारखे काम कोणी केली त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्हाला लाज वाटण्यासारखे आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. त्या पराभवाच्या भीतीने घाबरल्या आहेत. म्हणून कोणावरही काहीही टीका करत सुटल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही टीका केली तरी आम्ही काही बोलणार नाही. यांची योग्यता संपूर्ण राज्याने पहिली आहे. त्यांचे कोणाशी कसे, किती जवळचे संबंध आहेत हे जगाला माहित आहे. तुमचा राजकीय प्रवास कसा कसा झाला हे बेळगावच्या जनतेला तर खूपच चांगले माहिती आहे असा टोला संजय पाटील यांनी हाणला.
एकंदर, बेळगावात आता विधानसभा निवडणुकीचा एखादा चांगलाच रंगत चालला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे हेच संजय पाटील आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात रंगलेल्या वाक्युद्धावरून दिसून येतेय. आता हा वाद ऐन निवडणुकीच्या फडात कोणते वळण घेतो हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे


Recent Comments