Belagavi

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला बेळगाव शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद

Share

सातवा वेतन आयोग लागू करावा, त्याच्या शिफारशी येईपर्यंत 40% भरपाई द्यावी तसेच नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी या मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला बेळगाव शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. संपामुळे सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र दिसून आले.

राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी येईपर्यंत 40% भरपाई द्यावी तसेच नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष षडाक्षरी यांच्या निर्देशांवरून कर्नाटकात आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरवात झाली. बेळगाव जिल्ह्यातही सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकून संपाला पाठिंबा दिला. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरकारी कार्यालये संपामुळे ओस पडली होती. संपामुळे नागरिकांनीही पाठ फिरवल्यामुळे सरकारी कचेऱ्यांत शुकशुकाट पसरला होता.

बेळगावात जिल्हा इस्पितळातील आणीबाणी सेवा वगळता अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला. महानगरपालिका, तहसील कचेरी, जिल्हाधिकारी कचेरी, प्रादेशिक आयुक्त कार्यालय आदी सरकारी कार्यालयात नेहमीसारखी वर्दळ दिसून आली नाही. त्यामुळे सरकारी कामकाज ठप्प झाले होते. संपाची कल्पना नसल्याने कामकाजासाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायवगोळ यांनी बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष षडाक्षरी यांच्या आदेशावरून जिल्ह्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला आहे. सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत 40% भरपाई द्यावी, नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देऊन संप यशस्वी केल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शंकर गोकावी यांनी सांगितले की, सातवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. संप यशस्वी करण्यासाठी गेले काही दिवस जिल्हाभरात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. शांततेत, कोणाविरुद्धही घोषणाबाजी न करता कामावर बहिष्कार टाकून आम्ही संप करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा सरकारी इस्पितळातील (बीम्स) कर्मचाऱ्यांनीही वेगळ्या पद्धतीने संपात सहभाग दर्शवला. आणीबाणी सेवा विभागातील कर्मचाऱ्यांनी दंडावर काळ्या फिती बांधून रुग्णांची सेवा करत संपात भाग घेतला. याशिवाय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकून संपात भाग घेतल्याचे आरोग्य खाते कर्मचारी संघाचे नेते यल्लेश पंगन्नावर यांनी सांगितले.

बेळगाव महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही राज्यव्यापी संपात भाग घेतला. याबाबत म्हहिती देताना महानगर पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेश यावण्णावर यांनी सांगितले की, दर 5 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याची पद्धत देशभरात अस्तित्वात आहे. कर्नाटकात वेतन सुधारणेला 5वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे सातव्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. संपाला राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला आहे. बेळगाव महानगर पालिका कर्मचाऱ्यांनीही संपात भाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदर, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला बेळगाव जिल्ह्यात चांग प्रतिसाद लाभला. मात्र संपाची माहिती नसलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.

Tags: