सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्य सरकारच कारणीभूत आहे. सातवा वेतन आयोग नेमणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूदच केली नाही. पैशांची तरतूद केल्याचे बोम्मई खोटेच सांगत आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी केला.
बेळगावातील सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्दरामय्या म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सहावा वेतन आयोग नेमला होता. राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असूनदेखील 10,600 कोटी रुपयांची तरतूद केली. निवडणुकीपूर्वीच सहावा वेतन आयोग लागूही केला. भाजप सरकारला हे करण्याची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळेच त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगासाठी निधीची तरतूदच केलेली नाही. आता वीसेक दिवसात निवडणूक आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे नवीन काहीच करता येणार नाही. तशातच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प होईल. सातव्या वेतन आयोगाचा अंतरिम अहवाल मागवतो, असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणत असतील तर त्यांनी किमान तो मागवून लोकांपुढे तरी ठेवावा असे सिद्दरामय्यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार खोटारडेपणाचा कळस गाठत आहेत. पंतप्रधान मोदींनी 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट-तिप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. अच्छे दिन आणू, महागाई कमी करू असे सांगितले होते. कुठे गेली ही आश्वासने असा सवाल करून निवडणूक जाहीरनाम्यात तब्बल 600 आश्वासने देणाऱ्या भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा समोर ठेवून त्यापैकी किती आश्वासनांची पूर्तता केली हे जनतेला सांगावे असे आव्हान सिद्दरामय्यांनी दिले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर काँग्रेसने अन्याय करत असल्याच्या, मोदींच्या आरोपाचा समाचार घेताना सिद्दरामय्या म्हणाले, त्यांच्या डोळ्यात मुसळ आहे ते सोडून आमच्या डोळ्यातील कुसळ शोधण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. निजलिंगप्पा आजारी असल्यामुळे बाजूला झाले होते.
मात्र येडियुरप्पा धडधाकट असूनदेखील भाजपने त्यांना का दूर केले? मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताना येडियुरप्पानी डोळ्यात पाणी काढले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीसारख्याना भाजपने साईडलाईन का केले? भाजपसाठी एवढे योगदान दिलेल्यांवर ही वेळ का आणण्यात आली? असा सवाल करून मोदींनी आधी हे जाणून घ्यावे असा पलटवार सिद्दरामय्यांनी केला. मोदी मरू देत असे कोणी म्हणणार नाही, ते देशाचे पंतप्रधान आहेत, आरोग्यवंत राहू देत. पण भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करणे त्यांनी थांबवावे. कोरोना, महापूर काळात मोदी कितीवेळा राज्यात आले? कोरोना काळात कर्नाटकाच्या वाट्याचा ऑक्सिजन दुसऱ्या राज्यांना देण्यात केंद्र सरकार व्यग्र होते. न्यायालयाने कान उपटल्यावर त्यांना कर्नाटकाला ऑक्सिजन द्यावा लागला हे जनता विसरलेली नाही. राज्यात जनमत काँग्रेसच्या बाजूने आहे, येत्या निवडणुकीत त्यांचा पालापाचोळा होईल. भाजप नेत्यांच्या हे लक्षात आल्यानेच ते बेताल वक्तव्ये करत असल्याचा आरोप सिद्दरामय्यांनी केला.
‘काँग्रेसला राज्यात सत्तेवर येऊ देणार नाही’, या माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विधानावर रमेश जारकीहोळी एक हुंब नेता आहे, त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही असे सिद्दरामय्या म्हणाले. बेळगाव ग्रामीण मतदार संघात महापुरुषांच्या पुतळा स्थापनेवरून राजकारण तापले असल्याच्या प्रश्नावर बोलताना महापुरुषांना राजकानाचा विषय बनवू नये, त्यांचे विचार, तत्वे जीवनात अमलात आणावीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, केपीसीसी कार्याध्यक्ष जमीर अहमद, माजी आमदार फिरोज सेठ, राजू सेठ आदी काँग्रेस नेते उपस्थित होते.


Recent Comments