45 वर्षांच्या सामाजिक जीवनात मी निष्कलंक राहिलो आहे. मात्र माझ्याविरोधात अपप्रचार खूप केला गेलाय. मी कधीही विरोधी उमेदवारासाठी पूरक वागलेलो नाहीय. जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी येत्या 6 मार्च रोजी धर्मस्थळ येथे मंजुनाथ स्वामींच्या समोर शपथ घेणार आहे अशी माहिती गोकाकचे भाजप नेते अशोक पुजारी यांनी दिली.
बेळगावात पत्रकार परिषदेत माहिती देताना अशोक पुजारी म्हणाले, गेली 45 वर्षे मी सक्रिय राजकारणात असून नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहिलो आहे. या काळात 2008, 2013, 2018 ची विधानसभा निवडणूक जेडीएसतर्फे आणि 2019 ची निवडणूक भाजपतर्फे लढवली आहे. मात्र पहिल्या निवडणुकीपासून मी विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी पूरक काम करतो, आधी किंवा अंतिम टप्प्यात त्यांच्याकडून पैसे घेतो असा अपप्रचार करण्यात येतो. माझ्या पक्षाच्या नेत्यांकडेही असा अपप्रचार केला गेलाय, तो चुकीचा आहे. या आरोपांमुळे मला खूप दुःख झाले आहे असे पुजारी म्हणाले.
या अपप्रचारापासून माझे नेते, कार्यकर्ते, समर्थक, मतदार आणि जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा निर्णय मी घेतला आहे. यासाठी येत्या 6 मार्च रोजी धर्मस्थळ येथे मंजुनाथ स्वामींच्या समोर शपथ घेणार आहे, माझ्यासोबत माझी दोन्ही मुलेही शपथ घेणार आहेत. मी कधीही विरोधी उमेदवाराकडून पैसे घेतलेले नाहीत, ऐन टप्प्यात विरोधी उमेदवाराच्या पूरक भूमिका घेतलेली नाही हे मी मंजूनाथस्वामींच्या समोर यावेळी शपथपूर्वक सांगणार आहे असे अशोक पुजारी यांनी सांगितले. जनतेच्या मनात माझ्या विरोधात निर्माण केलेला संभ्रम, अपप्रचार दूर करण्यासाठी देवासमोर मी प्रतिज्ञापूर्वक निष्कलंक असल्याचे जनतेला पटवून देणार असल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला अशोक पुजारी यांचे समर्थक उपस्थित होते.


Recent Comments