Belagavi

वडगाव येळ्ळूर रस्त्याच्या अर्धवट कामकाजामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य

Share

वडगाव येळ्ळूर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून , धुळीपासून मुक्त करावे अशी मागणी येथील,रहिवाशांसहित दुकानदारानी केली आहे .

गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे कामकाज अर्धवट स्थितीत असल्याने , इथल्या रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे .
व्हॉइस ओव्हर : जिकडे पाहावे तिथे धुळीचे साम्राज … गाड्या , घरे एवढेच नाही तर दुकानांमधील प्रत्येक वस्तू धुळीने माखलेली …. आणि धुळीमुळे कंटाळून गेलेले इथले नागरिक एवढी धूळ कुठून आली ? याचे कारण आहे इथल्या रस्त्याचे केलेले अर्धवट कामकाज.

होय … तुम्ही पाहत असलेला हा रस्ता कुठल्या अविकसित गावातील नाही तर बेळगावमधील वडगाव ते येळ्ळूर या रस्त्याची ही दृश्ये आहेत . कधी गटार बांधणे , कधी पाईप बदलणे , ड्रेनेज दुरुस्ती आदी कारणांमुळे ह्या रस्त्याचे कामकाज अपूर्ण आहे . यामुळे मागील दोन ते अडीच महिन्यांपासून इथल्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे . शिवाय , या रस्त्यावरून , आनंदवाडी , संभाजीनगर, येळ्ळूर , सुळगा , आणि राजहंसगडाला अनेक वाहने याच मार्गावरून जात येत असतात . त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते . अनेक महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या दुरुस्तीच्या कारणामुळे या रस्त्याचे काम रेंगाळले आहे .

रस्त्यावर टाकण्यात आलेली लाल माती उन्हाने तापून त्याचे पावडर मध्ये रूपांतर झाले आहे . वारा तसेच या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांमुळे आसपासची घरे, वाहने तसेच दुकानांमध्ये धुरळा जात आहे . यामुळे दुकानदार आणि लोक वैतागून गेले आहेत . काहींनी तर आपली दुकानच बंद ठेवली आहेत . हिरवीगार झाडेदेखील धुळीने माखून गेली आहेत .

या धुराळ्याला कंटाळून गेलेल्या इथल्या नागरिकांनी आपली मराठीला माहिती देताना सांगितले कि या अविकसित रस्त्यामुळे इथल्या जनतेला फार त्रास सहन करावा लागत आहे . अन्य ठिकाणी रस्ते सुस्थितीत असतानादेखील त्यांचे विनाकारण काँक्रीटीकरण केले जात आहे . मात्र आवश्यक असलेल्या या भागात रस्त्याचे काम अर्धात ठेवण्यात आले आहे . कंत्राटदाराने या रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा करावी असा आग्रह यावेळी इथल्या रहिवाशांनी केला .

तर रस्त्याच्या अर्धवट कामकाजामुळे उडणाऱ्या धुळीमुळे कंटाळून गेलेल्या दुकानदाराने सांगितले कि , रस्त्याचे कामकाज स्थगित ठेवण्यात आले आहे . त्यामुळे या रस्त्यावरील धुराळा उडून दुकानात येतो . दुकानांसमोर प्लास्टिक लावून आम्ही व्यवसाय करीत आहोत . दुकानातील सर्व वस्तूंवर धुळीचा थर बसत असल्याने , वारंवार साफसफाई करावी लागत आहे . धूळ पाहून गिऱ्हाईके देखील दुकानात येणे कमी झाली आहेत . संबंधितांनी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी त्यानी केली .

एकंदर ह्या वडगाव येळ्ळूर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून , इथल्या जनतेची धुळीपासून सुटका करावी अशी मागणी केली जात आहे .

Tags: