विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून जीवनातील अडचणी, समस्यांमुळे नाउमेद न होता चांगले शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी केले.
बेळगावातील कणबर्गी येथील महेश फौंडेशनच्या शाळेच्या सभागृहात आयसीआयसीआय बॅंक फौंडेशनच्या वतीने आयोजित चिल्ड्रन स्कूल बस प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले की, झोपडपट्टी परिसरातील गरीब मुलांचे भविष्य सुनिश्चित करण्याचे महेश फौंडेशनचे सेवाभावी कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, ते आणखी विस्तारावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्रमुख पाहुणे म्हणून आलेले बेळगावचे प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ म्हणाले की, मुलांमध्ये शक्ती असते, मुलांनी चांगले शिक्षण घेऊन समाजाचे आदर्श सदस्य बनून उच्च पदावर राहून समाजाची सेवा करावी. झोपडपट्टीतील गरीब मुलांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या महेश फौंडेशन या संस्थेने अशा अधिकाधिक मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आहे, ही अभिमानाची बाब आहे, त्यांनी आपल्या सत्तेचा स्वार्थासाठी वापर न करता लोकांच्या समस्यांना प्रतिसाद द्यावा. या संस्थेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यानी भविष्यासाठी कठोर परिश्रम करून आपले ध्येय गाठावे, तसेच या संस्थेचा लौकिक वाढवावा असे सांगितले.

आयसीआयसीआय बँक फौंडेशनचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश राव म्हणाले की, आयसीआयसीआय बँक ही केवळ जनतेला कर्ज सुविधा देणारी आणि त्याची वसुली करणारी संस्था नाही, तर ती आयसीआयसीआय बँक फौंडेशनच्या वतीने लोकांसाठी चांगली, सामाजिक कामेही करत आहे. गरीब मुलांच्या शिक्षणावर विशेष भर देऊन, लोकांच्या समस्यांना प्रतिसाद देण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे. महेश फौंडेशनच्या कामाची दखल घेऊन या फौंडेशनच्या वतीने शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी सुमारे 29 लाख रु. निधीतून बस उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय आणखी अनेक सार्वजनिक कामांमध्ये आयसीआयसीआय बँक फौंडेशनचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
आयसीआयसीआय बँक फौंडेशनचे क्षेत्रीय प्रमुख अब्दुलजी नदाफ म्हणाले की, आमच्या फौंडेशनच्या वतीने 10वी आणि 12वीत नापास झालेल्या मुलांना बंगळुरमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय अनेक सामाजिक कामे करण्यात येत आहेत. महेश फौंडेशन वंचित मुलांसाठी अतिशय चांगले काम करत आहे. या संस्थेत शिकणाऱ्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांचे भविष्य घडावे व ते उंच व्हावे, यासाठी उच्च सामाजिक कार्यात स्वत:ला सहभागी करून घेत आमच्या फौंडेशनने संस्थेला बस उपलब्ध करून दिली आहे असे सांगून त्यांनी महेश फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी महेश फौंडेशनचे प्रमुख महेश जाधव यांनी संस्थेला दिलेल्या देणगीबद्दल आभार मानले. याप्रसंगी वेणुगोपाल राव तसेच अन्य मान्यवर, संस्थेतील विध्यार्थी, निमंत्रित आदी उपस्थित होते.


Recent Comments