Belagavi

एक पाऊल जागरूकतेचे ! चोऱ्या रोखण्यासाठी चक्क शिट्ट्यांचे वाटप

Share

बेळगावच्या महांतेश नगरमध्ये चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी रहिवाशांनी नवीन शक्कल लढवली आहे. डीअर वूड फौंडेशनच्या वतीने घरोघरी शिट्ट्या वाटप करून चोरी रोखण्यासाठी नवीन प्रयत्न करण्यात येत असल्याचे महांतेश नगर येथील रहिवासी चंद्रमती वेर्णेकर यांनी सांगितले.

कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रमती वेर्णेकर यांनी सांगितले की, “तुमचे घर, तुमची वसाहत, तुमचे कौशल्य” हे ब्रीदवाक्य घेऊन महांतेश नगरातील चोऱ्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या भागात गेल्या पंधरा दिवसांत दुचाकी चोरीच्या ४ आणि सोनसाखळी पळविण्याचा प्रयत्न केल्याची १ घटना घडली आहे. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी सर्व घरांमध्ये शिट्ट्या देण्यात येत आहेत. रात्रीच्यावेळी एखाद्या घरी चोरी होत असेल तर त्यांनी शिट्टी वाजवली की, शेजारी मदतीस यावेत हा यामागचा हेतू आहे. शिट्टी ऐकली की, शेजाऱ्यांनी न भीता, अडचणीत सापडलेल्या शेजाऱ्याच्या मदतीस धावून जावे असे सर्वांना सांगण्यात आले आहे. याने चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल, असे त्यांनी सांगितले.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने उपाययोजना करण्यासाठी परिसरातील सुमारे 120 रहिवाशांची सभा घेऊन खबरदारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, महानगर पालिका, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला पथदिपासारख्या सुविधा पुरविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. पथदिवे नसल्याने चोरट्यांना चोरी करणे सोपे जाते, त्यामुळे सर्वत्र दिवे लावावेत. प्रत्येक घरात कॅमेरा बसवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. पोलिसांनी रात्रीची गस्त नियमित घालावी, असा आग्रह त्यांनी केला.

पत्रकार परिषदेला प्रेम चौगला, पी. आर. हिरेमठ, हलगप्पा चिंचलकट्टी, एस. एस. मतगी, बी. डी. माळी, विनय माळगी, व्ही. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Tags: