Belagavi

महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित : अभय पाटील

Share

बेळगाव महापालिकेच्या उद्या होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निश्चित विजयी होतील, असा विश्वास दक्षिण मतदारसंघातील आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.

बेळगावात नियोजित शिवसृष्टी येथे पत्रकार परिषदेत बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, भाजप प्रदेश उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा आज जिल्ह्यात येत असून, सायंकाळी बेळगाव भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर महापौर आणि उपमहापौर कोण होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

एकाही सदस्याने मीच महापौर होणार असा मुद्दा माझ्यासमोर मांडला नाही, त्यामुळे निवडणुकी दिवशीच मी आणि आमदार अनिल बेनके यांनी बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यानंतर तेथे कोणी इच्छुक असल्यास त्यांना पक्षाच्या नेत्यांना भेटून त्यांचे मत व्यक्त करता येईल. या प्रकरणी इच्छुकांनी लॉबी करू नये, असे ठरल्याप्रमाणे सर्व नगरसेवक वागले आहेत. यावेळी कन्नडिगाला महापौर करावे, अशी मागणी करवे कार्यकर्त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या 2022-23च्या निवणुकीत भाजपचे 35 जण निवडून आले आहेत. त्यातून एकाची महापौरपदी निवड करण्यात येईल, पण उपमहापौर पद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने कोणाची निवड करणार या प्रश्नावर आम्ही काय करू याचे उत्तर उद्या तुम्हाला मिळेल, असे ते म्हणाले.

अभय पाटील यांना मीडियामध्ये किंग मेकर म्हटले जाते, मी किंग मेकर नाही, आमच्या पक्षातील सामान्य कार्यकर्ते किंग मेकर आहेत, असे ते म्हणाले. उपमहापौरपदासाठी ऑपरेशन कमळ होणार की नाही याबाबत उद्या तुम्हाला कळेल. आमचा पक्ष संघटना आधारित पक्ष आहे, व्यक्ती आधारित पक्ष नाही. सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस आणि म. ए. समितीच्या अपक्ष सदस्यांसोबत घेतलेल्या बैठकीच्या मुद्द्यावर त्यांनी मागील महापौर-उपमहापौर निवडणुकीचा इतिहास पाहिला तर सर्व प्रश्नांची उत्तम उत्तरे मिळतील, असे म्हणत आ. अभय पाटील यांनी सूचक मौन बाळगले.

एकंदर, महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा दावा आ. अभय पाटील यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच केला आहे.

Tags: