शहापूर, बेळगाव येथील श्री दानम्मा देवी मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या स्थापनेच्या ३८ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने 2 ते 4 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री दानम्मा देवी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर एस. बेंबळगी यांनी दिली.

दानम्मा देवी जत्रा महोत्सवानिमित्त श्री जगज्योती बसवेश्वर कल्याण मंदिर ट्रस्ट आणि केएलई हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत माहिती देताना बेंबळगी म्हणाले की, आजपासून तीन दिवस ही जत्रा उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त केएलई हॉस्पिटल आणि श्री दानम्मा देवी कल्याण मंदिर ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. त्याला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आजपासून तीन दिवसीय वार्षिकोत्सवाचे डॉ. व्ही. बी. कोटीवाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी भव्य पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, वार्षिकोत्सवानिमित्त भाविकांनी श्री दानम्मा देवीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. श्री दानम्मा देवी मंदिर समितीचे सरचिटणीस सी. एम. कित्तूर, विश्वस्त सी. व्ही. बेंबळगी, विजयालक्ष्मी, ए. एस. अनिल आदी उपस्थित होते.


Recent Comments