भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार विविध चॅनेल्सनी आपल्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे केबलसेवा महागणार असून, दर्शकानी सहकार्य करण्याचे आवाहन मेट्रोकास्ट इंडिया प्रा. लि.चे एमडी नागेश छाब्रिया यांनी केले आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) सर्व टीव्ही चॅनेल्सना दरवाढीबाबत निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार टीव्ही चॅनेल्सनी दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे केबलसेवा महागणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसह विविध जिल्ह्यांत केबलसेवा पुरविणाऱ्या मेट्रोकास्ट इंडिया प्रा. लि.चे एमडी नागेश छाब्रिया यांनी दर्शकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना नागेश छाब्रिया यांनी सांगितले की, ट्रायने दीड महिन्यापूर्वी दरवाढीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याला न्यायालयात स्थगिती मिळाली अशी अपेक्षा होती. पण तसे झालेले नाही. त्यानंतर स्टार, झी, डिस्नेसह सर्व चॅनेल्सनी केबल दरात मोठी वाढ केली आहे. सुमारे 200 ते 300% इतकी ही वाढ आहे. त्यामुळे केबलसेवेच्या मासिक शुल्कात वाढ करणे अपरिहार्य बनले आहे. स्टार चॅनेलचे 49 रुपयांचे फॅमिली पॅक आता जीएसटीसह 62 रुपये झाले आहे. झी चॅनेलचे पॅक 39 रुपयांवरून 49 रुपये झाले आहे. अन्य चॅनेल्सनीही अशाचप्रकारे दरात मोठी वाढ केली आहे असे त्यांनी सांगितले.
मेट्रोकास्ट इंडिया प्रा. लि.कडून बेळगाव जिल्ह्यासह अन्य अनेक जिल्ह्यात गेली 30 वर्षे ग्राहकांना परवडेल अशा माफक दरात केबलसेवा देण्यात येत आहे. दर्शकांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. आता टीव्ही चॅनेल्सनी दरात वाढ केल्यामुळे कंपनीलाही केबलचे दर वाढविणे अपरिहार्य बनले आहे. तरीही कमीतकमी दरवाढ करून ग्राहकांच्या खिशावर भर पडणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. सरकार आणि ट्रायच्या नियमांनुसारच ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शकानी पूर्वीप्रमाणेच यापुढेही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन नागेश छाब्रिया यांनी केले आहे.
एकंदर, ट्रायच्या नियमांनुसार चॅनेल्सनी दरवाढ केल्याने केबलसेवा महागणार आहे.


Recent Comments