रमेश जारकीहोळी हल्ली खूप खोटे बोलत आहेत. बोलण्याच्या ओघात खालच्या स्तरावरची भाषा वापरत बेजबाबदार आरोप करत आहेत. गोकाकची जनताच त्यांना यावेळी योग्य धडा शिकवेल असा गर्भित इशारा देत एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात शड्डू ठोकले.
रमेश जारकीहोळी यांनी बेळगावात आज पत्रकार परिषद घेऊन ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर तसेच केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोप केले. त्याच्या काही वेळातच आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांची भूमिका मांडली. रमेश जारकीहोळी यांची मनस्थिती बिघडल्याने ते बेजबाबदार आरोप, विधाने करत असल्याचा आरोप केला. त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हे त्यांचे त्यांना तर माहित आहे का असा प्रश्न पडतो असे सांगून, रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना उमेदवारी दिल्याच्या दाव्याचा त्यांनी समाचार घेतला.
उमेदवारी देताना २०१८मध्ये शिवकुमार नव्हे तर जी. परमेश्वर केपीसीसी अध्यक्ष होते. हेब्बाळकर प्रथमच आमदार झाल्या आहेत. पण उमेदवारी मी दिली म्हणणे म्हणजे, रमेश जारकीहोळी सोनिया गांधी, राहुल, प्रियांका यांच्याहून मोठे आहेत का? असा सवाल त्यांनी केला. रमेश यांनी लक्ष्मी हेब्बाळकर याना उद्देशून ‘विषकन्या’ असा शब्द वापरला होता त्याचा त्यांनी निषेध केला. आमच्या शब्दकोशातही असे अनेक शब्द आहेत, जे आम्ही त्यांच्या विरोधात वापरू शकतो. मात्र राज्यातील, जिल्ह्यातील जनता पहात आहे. ती आमची, त्यांची तुलना करेल. बहीण लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. केलेले आहे, मी इंजीनिअर आहे, सात देश फिरलो आहे. त्यांच्यासारखं विधान केलं तर लोकांना ते कसे दिसेल?. गोकाकमध्येही लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समर्थक आहेत, गोकाकची जनता सुज्ञ आहे. ती त्यांना धडा शिकवेल. निवडणुकीत गोकाक येथे जाऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार करू असा इशारा त्यांनी दिला.
हट्टीहोळी पुढे म्हणाले, आमच्याकडे रमेश जारकीहोळीसारखा बेहिशेबी पैसा आणि त्यांच्यासारखी क्षुद्र मानसिकता नाही. हेब्बाळकर आपल्या कामाच्या बळावर निवडून आल्या आहेत. राणी चन्नम्मा यांच्याबाबत त्या कधीही हलक्या शब्दांत बोलल्या नाहीत. कदाचित रमेश जारकीहोळीच तसे बोलले असावेत, कोणीतरी त्याची ऑडिओ क्लिप बनवून ती उघड करणार असेल म्हणून आपल्यावरचे बालंट आमच्यावर घालत
ते आमच्यावर आरोप करत आहेत, आपल्याकडे ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करत आहेत. पण त्यांच्याकडे फक्त कट पेस्ट ऑडिओ क्लिप आहेत. आमच्याकडे कोणतीही ऑडिओ क्लिप नाही, त्यामुळे आम्ही कोणतीही ऑडिओ क्लिप रिलीज करणार नाही, असे सांगून व्हॉट्सऍप ऑपरेट करता येत नाही असे रमेश जारकीहोळी म्हणतात. पण संपूर्ण कर्नाटकच्या लोकांनी ते व्हॉट्सऍप कसे ऑपरेट करतात हे पाहिले आहे असा टोला त्यांनी हाणला. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना रमेश जारकीहोळी यांनी आ. हेब्बाळकर यांना संपर्क साधून काँग्रेस सोडून सोबत येण्याची सूचना केली. मात्र त्यांनी काँग्रेस सोडणार नाही, पक्षाशी एकनिष्ठ राहीन असे सांगितल्याचा रागातून जारकीहोळीनी कुरघोडी सुरू केली असा आरोप त्यांनी केला.
हर्षा शुगर कायद्याने नोंदणीकृत उद्योग असून, सर्व व्यवहार पारदर्शकपणे ऑडिट करून सरकारला कागदपत्रे दिली आहेत. त्यांनी याबाबत बिनबुडाचे आरोप केले आहेत. काळ्या पैशाबाबत कागदपत्रे असतील तर त्यांनी ती सादर करावीत. याउलट रमेश यांच्या नेतृत्वाखालील सौभाग्यलक्ष्मी साखर कारखान्यांकडून बँकांची फसवणूक करण्यात आली आहे. सौभाग्यलक्ष्मी कारखान्यात ६० केएलपीडी क्षमतेचे इथेनॉल युनिट असल्याचे त्यांनी एनसीआरटीला लेखी दिले आहे. ते कुठे आहे हे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सिद्ध करावे. हे युनिट उभारण्यासाठी तुम्ही कर्ज घेतले ते कुठे गेले? हे आधी सांगा, मग आमच्यावर आरोप करा, त्याला आम्ही स्पष्टीकरण देऊ असे आव्हान हट्टीहोळी यांनी दिले. इतरांना दोष देणे सोपे आहे. पण खोटे बोलणे थांबवा आणि कागदपत्रे घेऊन या
आम्ही प्रत्युत्तर देऊ. बालिश विधाने करणे बंद करा, तुमच्या आरोपामुळे संपूर्ण सहकार खाते भ्रष्ट झाले असे ते म्हणाले. ‘शिवकुमार यांच्यावर सीबीआयकडे सीडीचा खटला दाखल करून अटक करायला लावेन’ या रमेश जारकीहोळींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याची यातून पुष्टी होते असे हट्टीहोळी यांनी सांगितले. वर्ष-दीड वर्ष गप्प बसले, इतके दिवस सीबीआयकडे सीडीचा खटला का दाखल करण्यात आला नाही? याचा अर्थ आता ईडी, सीबीआय, आयटी रमेश जारकीहोळी यांच्या तालावर नाचणार असा होतो. रमेश जारकीहोळी फाटक्या तोंडाचे आहेत, बेताल बोलतात. घाणेरडे बोलतात. काहीही बोलतात आणि नंतर मी असे बोललोच नाही असा ‘यु टर्न’ घेतात. पूर्वी प्रसारमाध्यमांतील एका प्रतिनिधीलाही ते घाण बोलले होते. त्यामुळे माध्यमांनी त्यांच्यावर बहिष्कारही घातला होता. त्यांनी सुळेभावित एका मताला ६ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आणि प्रसारमाध्यमांसमोर मी तसे बोललोच नाही असे सांगितले. त्यांना जनताच योग्य धडा शिकवेल असे हट्टीहोळी यांनी सांगितले.
एकंदर, रमेश जारकीहोळी यांच्या आरोपांवर आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावतीने स्पष्टीकरण देतानाच एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनी रमेश यांना गर्भित इशारा दिला आहे. आता हे वाकयुद्ध कोणते वळण घेते हे पहावे लागेल.


Recent Comments