Belagavi

बेळगाव जिल्हा भाजपमध्ये कसलेही मतभेद नाहीत; उद्या अमित शाह बेळगावात : महेश टेंगिनकाई

Share

बेळगाव जिल्हा भाजपमध्ये कसलेही मतभेद नाहीत असा दावा भाजप प्रदेश सरचिटणीस महेश टेंगिनकाई यांनी केला. पक्षाच्या विजयसंकल्प यात्रेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या बेळगावच्या दौऱ्यावर येणार असून, पक्ष संघटनेविषयी बैठक आणि एम. के. हुबळी येथे जाहीर सभा घेणार आहेत माहितीही त्यांनी दिली.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश टेंगिनकाई म्हणाले, कित्तूर, खानापूर आणि बैलहोंगल या तीन मतदारसंघासाठी एम. के. हुबळी येथे दुपारी ४ वाजता अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील सहभागी होणार आहेत. यावेळी अमित शाह भाजपचे संघटन मजबूत करण्याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणार आहेत. तिन्ही मतदार संघांप्रमाणेच बेळगाव महानगर, ग्रामीण आणि चिक्कोडी जिल्हा भाजपला शाह यांची ही सभा बूस्टर डोस ठरेल असे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात अमित शाह बेळगावातील यूके २७ हॉटेलमध्ये पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या दोन सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील भाजपचे मिशन -१५० यशस्वी करण्यासंदर्भात ते महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपचे १ कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यापैकी ६० लाख सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा भाजपमध्ये मतभेद नसल्याचा दावा करून महेश टेंगिनकाई म्हणाले की, काही किरकोळ मतभेद असतील तर ते पक्षनेते दूर करतील पण पक्ष म्हणून सर्व नेते एकसंघ असून, एकजुटीने आगामी निवडणुकीला सामोरे जातील. काही इच्छुकांनी विशेषतः रमेश जारकीहोळी यांनी नागेश मन्नोळकर यांना घेऊन प्रचार सुरूही केलाय. त्यामुळे त्यांना उमेदवारी निश्चित आहे का या प्रश्नावर, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. पक्षात उमेदवारीसाठी मंडळ स्तरावरून विविध टप्प्यावरून शिफारस करण्यात येते. त्यावरून पक्षश्रेष्ठी अंतिमतः उमेदवारी जाहीर करतात.

अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. जारकीहोळी यांनी एखादा खासगी कार्यक्रम घेतला असावा. पण जर कोणी आतापासूनच पक्षाचा उमेदवार भासवून प्रचार करत असेल तर ते पक्षाध्यक्षांच्या निदर्शनास आणून देऊ, ते यावर योग्य कारवाई करतील असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने भाजपविरोधात केलेल्या पोलीस तक्रारीबाबत बोलताना, आम्ही कुकर वाटणारे नाही, खोटी आश्वासने देणारे नाही, आम्ही लोकांसोबत आहोत आणि लोक आमच्यासोबत आहेत असे सांगत त्यांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर भाजपात येणार असतील तर त्यांना प्रवेश देणार का या प्रश्नावर, भाजपची विचारधारा मान्य करून जर कोणी येत असतील तर पक्ष त्यांना प्रवेश देईल असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी, अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथसिंग, योगी आदित्यनाथ आदी आघाडीचे नेते राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रचारसभा घेणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, आ. अनिल बेनके आदी उपस्थित होते.

Tags: