Haveri

हावेरीत सर्व सिंचन प्रकल्प आमच्या सरकारने केले सुरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

बडगी, हानगल, हावेरीसह सर्व सिंचन प्रकल्प आमच्या सरकारने सुरू केले आहेत असा दावा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
जनसंकल्प यात्रेसाठी हिरेकरूर येथे आले असता, हेलिपॅडवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बोम्मई म्हणाले, आज हिरेकेरूरमध्ये सिंचनासह अनेक विकासकामांचा शुभारंभ करत आहोत. या भागात सिंचन प्रकल्पांची अनेक दिवसांपासून मागणी होती. मंत्री बी. सी. पाटील यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मंजुरी दिल्यानंतर आम्ही त्यांना चालना देत आहोत असे त्यांनी सांगितले.

आम्ही जनसंकल्प यात्रेचा पुढील भाग सुरू केला आहे. बी. एस. येडियुरप्पाही त्यासाठी दाखल झाले आहेत. जनसंकल्प यात्रा ही विजयसंकल्पयात्रा असेल.

जेडीएसवाले काँग्रेस-भाजपला एक टीम म्हणतात. काँग्रेसवाले जेडीएस आणि भाजपला एक टीम म्हणतात. आम्ही ए टीम आहोत हे दोघेही मान्य करतात. ते बी टीम केव्हा बनतील हे त्यांच्यावर अवलंबून आहे. वास्तवात आम्ही ए आणि बी पेक्षाही लोकांची टीम आहोत असे बोम्मई म्हणाले.

काँग्रेसने भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्याबाबत प्रतिक्रिया म्हणाले, ही अत्यंत खालची पातळी आहे. ज्यांनी वक्तव्य केले तेच त्याबाबत स्पष्ट करतील. दिग्विजय सिंह यांनी परवा विधान केले आहे. राहुल गांधींनी काल ते विधान केलं, कुणी काहीही वक्तव्य केलं तर याला सरकार जबाबदार नाही. ते वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही सुनावले आहे. हे सर्व माहीत असतानाही पराभव निश्चित असल्याने केवळ राजकीय कारणांसाठी खोटे व राजकीय हेतूने प्रेरित आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

पण लोकांना हे सर्व माहीत आहे. भविष्यात ते पुन्हा प्रयत्न करतील. देशात कायदा आहे. त्या कायद्यानुसार सर्व काही केले जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेसचे आमदार मतदारांना आमिष दाखवत पकडले गेले आहेत. त्यांच्याबद्दल ते बोलत नाहीत. काँग्रेस हा प्रेशर कुकर पक्ष आहे. तिकडे बॉम्ब कुकर आहे, इकडे प्रेशर कुकर आहे. निवडणुकीत प्रेशर कुकर देऊन विजयी होतात. त्यामुळे त्यांना कुकरवर खूप प्रेम आहे. त्यात बॉम्ब ठेवला तरी ते त्याला प्रेशर कुकर म्हणतात. अशा प्रकारचा धिंगाणा घालून काही उपयोग होणार नाही. काँग्रेस राजकीयदृष्ट्या दिवाळखोर बनला आहे अशी टीका मुख्यमंत्र्यानी केली.

एकंदर, भाजप सरकारनेच हावेरी जिल्ह्यातील सिंचन योजना सुरु केल्याचा दावा करत बोम्मई यांनी काँग्रेसवर सडकून टीका केल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: