डॉ. प्रभाकर कोरे यांनी काही नवीन केले की, ते मला उद्घाटनाला बोलावतात. त्यामुळे मी डॉक्टरांना म्हणतो की, मी तुमची इतकी उद्घाटने केली, त्यासाठी मी काहीच मागत नाही. तेवढे बेळगाव देऊन टाका आणि विषय संपवून टाका, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. बेळगावसह इतर मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जावा ही महाराष्ट्राची जुनी मागणी आहे. यावर कोर्टातही सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राचे राजकारण सीमावादावरुन मोठ्या प्रमाणात पेटेलेले आहे. आता यातच शरद पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये काल शरद पवार यांच्या हस्ते केएलई संस्थेच्या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. प्रभाकर कोरे हे या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. ते बेळगावात राहतात. ते शरद पवार यांचे चांगले मित्र आहेत. शरद पवार यांनी कोरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यावेळी शरद पवार यांनी हे मिश्किल विधान केले.
डॉ. प्रभाकर कोरे आपल्या भाषणात म्हणाले, शरद पवार आमच्याकडे नेहमी बेळगाव कधी देणार, अशी विचारणा करत असतात. त्यावर मी त्यांनी म्हटले की, बेळगावच कशाला संपूर्ण कर्नाटकच घेऊन टाका. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी तेवढे बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा म्हटले.
बोम्मई-पवार सामना
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यावरुन शरद पवार आणि बोम्मई यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. सांगलीच्या जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकात येण्यास तयार असल्याचे बोम्मई यांनी म्हटले होते. त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. बेळगाव, कारवार, निपाणी आम्हाला देणार असाल तर जतच्या गावांची चर्चा करु, असे शरद पवार यांनी म्हटले होते.


Recent Comments