Belagavi

बेळगावात हुतात्मादिनी पुन्हा प्रकटला महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार

Share

मराठी भाषेच्या रक्षणासाठी, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आम्ही पुकारलेला लढा यात यश मिळेपर्यंत सुरूच राहिला असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिला.

बेळगावातील हुतात्मा चौकात १७ जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने पार पडला. यानिमित्त महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार बेळगावात पुन्हा एकदा प्रकटला. यावेळी बोलताना दीपक दळवी म्हणाले, १९५६मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी बेळगाव हा मराठी बहुल भाग कर्नाटकात सामील केल्याची घोषणा केली. त्या क्षणापासून सुरु झालेला सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा गेली ६२ वर्षे अखंडपणे सुरु आहे. हा स्वाभिमान आम्हाला कोणी शिकवलेला नाहीय. हा स्वाभिमान, ही उर्मी आमच्यात नैसर्गिकपणे आली आहे. आमचा मराठी मातृभाषेच्या, मराठी संस्कृतीच्या स्वतःच्या राज्यात सामील होण्याचा हा लढा आम्ही यात यश मिळवेपर्यंत सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला. गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी १७ जानेवारीला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे अर्ध्वयू भाई एन. डी. पाटील यांचे निधन झाले. ही तुम्हा-आम्हा सर्वांसाठी दुःखाची बाब आहे. चळवळीतील असे मोहरे गमावताना, त्यांच्या पश्चात नव्या उर्मीने हा लढा सुरु ठेवण्याचे आवाहन दीपक दळवी यांनी केले.

यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी संपूर्ण चळवळीचा इतिहास सांगितला. भाषावार प्रांतरचनेच्याही प्रांतरचनेच्याही आधीपासून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु आहे. २४ ऑगस्ट १९४८ रोजी बेळगावात ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात आचार्य अत्रे यांनी संपूर्ण मुंबई प्रांताचा समावेश महाराष्ट्रात करण्याचा ठराव केला होता. तेंव्हाच महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. १९५६ मध्ये भाषावर प्रांतरचना झाली तेंव्हा कर्नाटक राज्य देशाच्या नकाशात तरी होते का? हे कर्नाटकातील राजकारण्यांनी सांगावे. त्यावेळी कर्नाटकातील बेळगाव, कारवार, विजापूर आणि धारवाड हे चार जिल्हे मुंबई प्रांतात होते. काही जिल्हे हैदराबाद तर काही जिल्हे मद्रास प्रांतात होते. केवळ दक्षिणेकडचे म्हैसूर संस्थान होते. १९७३मध्ये खऱ्या अर्थाने कर्नाटकाची स्थापना झाली. अन्यायाने मराठी सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्यावेळी १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या पहिल्या आंदोलनात पै. मधु बेन्नाळकर, मधु बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे आणि निपाणीत कमळाबाई मोहिते हे पाच हुतात्मे झाले. १९५८च्या दुसऱ्या सत्याग्रहात गोपाळ चौगुले, नागाप्पा होसूरकर आणि निलजकर या सत्याग्रहींनी बेळ्ळारी तुरुंगात प्राण सोडले. अशा अर्थाने पहिले ८ हुतात्मा बेळगाव सीमाभागात झाले. त्यानंतर मुंबईत शिवसैनिक असे एकूण १०६ हुतात्मे आजवरच्या सीमाप्रश्नाच्या आंदोलनात झाले आहेत. बॅ. नाथ पै यांनी हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात बेळगावात प्रखर भाषण केले. दुर्दैवाने त्याचदिवशी रात्री त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. गेल्यावर्षी १७ जानेवारीलाच चळवळीचे अर्ध्वयू एन. डी. पाटील यांचे निधन झाले. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे त्यांनी सांगितले. त्यासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकी राखून लढ्यात सहभागी होण्यास आवाहन मालोजीराव अष्टेकर यांनी मराठी भाषिकांना केले.
प्रारंभी एन. डी. पाटील यांच्यासह सीमाप्रशी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र एकीकरण समिती, म. ए. समिती महिला आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने तसेच वैयक्तिकरित्या पुष्पचक्र वाहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा दिन कार्यक्रमास येणार असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने याना बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात प्रवेशबंदी केल्याबद्दल कर्नाटक सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.

‘अमर रहे, अमर रहे, हुतात्मा अमर रहे’, ‘बेळगाव. कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नाही तो जेल में’ अशा गगनभेदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर घोषणा देतच रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली आदी मार्गांवर हुतात्मा दिनाची फेरी काढण्यात आली.
अभिवादन कार्यक्रम आणि फेरीमध्ये नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुद्धा भातकांडे, म. ए. युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, मदन बामणे, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, माजी महापौर किरण सायनाक, विकास कलघटगी, महादेव पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रामा शिंदोळकर, पत्रककार जयवंत मंत्री, किरण गावडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, दत्त जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, शहरप्रमुख बंडू केरवाडकर, राजू बोकडे, माजी उपमहापौर धनराज गवळी, शिवाजी हावळान्नाचे, नारायण कीटवाडकर, अभिजित मजूकर, दीपक गौंडाडकर, मनोज पाटील, अप्पासाहेब गुरव, संजय शिंदे, भागोजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: