भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 100 कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. 100 कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणून गडकरींना संपवू अशीही धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, ही धमकी बेळगावमधील हिंडलगा तुरुंगातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. धमकी देणाऱ्या तुरुंगातील व्यक्तीचे नाव जयेश कांता असे आहे.
याबाबत नागपूर पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तरुंगातून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जयेश कांता असे आहे. हा आरोपी कुख्यात गुंड असून त्याच्यावर खुनाचा आरोप आहे,” अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात शनिवारी (14 जानेवारी) धमकीचे तीन फोन कॉल्स आले होते. नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन करण्यात आला होता. आपण दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असून 100 कोटी रुपये द्या अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी या फोनद्वारे देण्यात आली होती. एकूण तीन निनावी फोन कॉल्सनंतर गडकरी यांचे निवासस्थान तसेच कार्यालयावरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत कॉल ट्रेस केला होता. हा फोन कॉल बेळगामधून आला होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथकही कर्नाटकमध्ये रवाना झाले होते.
हिंडलगा कारागृहातील जयेश कांत या कैद्याने धमकीचा फोन केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
जयेश कांता हा कुख्यात गुंड असून, काल तीन वेळा फोन केला केला होता. त्याने दुसऱ्या एका कैद्याकडून पत्नीला फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन फोन केला. गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही बाब नागपूर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या तपासात हा फोन हिंडलगा कारागृहातून आल्याचे निष्पन्न झाले. नागपूर पोलिसांनी तातडीने बेळगाव गाठून रात्री हिंडलगा कारागृहाला भेट देऊन माहिती गोळा केली.
मंगळुरू येथील एका खुनाच्या गुन्ह्यात जयेश तुरुंगात आहे. यापूर्वीही त्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला धमकीचा फोन केला होता. 21 एप्रिल 2018 रोजी जयेशने अलोककुमार यांना धमकीचा फोन केला होता. त्यावेळी अलोककुमार उत्तर विभागाचे आयजीपी होते. जयेशने त्यांना फोन करून आपण नक्षलवादी असल्याचा मेसेज करून धमकी दिली होती. त्यानंतर बेळगावच्या एपीएमसी पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 च्या केस फाईलची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली आहे. नागपूर पोलीस आजही हिंडलगा कारागृहात त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.


Recent Comments