Belagavi

फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून असहाय्य वृद्ध महिलेला मदत

Share

बेळगावातील हिंडलगा गणपती मंदिराशेजारी असहाय्य अवस्थेत बसून राहिलेल्या वृद्ध महिलेला फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने बीम्स सरकारी रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

बैलहोंगल तालुक्यातील वकुन्द येथील पार्वती लोकरी नामक बेघर, असहाय्य वृद्ध महिला कडाक्याच्या थंडीत हिंडलगा गणपती मंदिरामागे हनुमाननगर डबल रोडवर बसून होती. तिच्या चेहऱ्याला सूज आली होती आणि तिला चालत येत नव्हते. हे पाहून फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन तिची चौकशी केली. संतोष दरेकर यांनी डीसीपी रवींद्र गडादी यांना याबाबत माहिती देऊन पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार डीसीपी गडादी यांनी एपीएमसी पोलिसांना सूचना दिली.

एपीएमसी पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर मंजुनाथ हिरेमठ, पोलीस मनोहर एम. व्ही. यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी ऍम्ब्युलन्समधून पार्वती लोकरी यांना बीम्स इस्पितळात उपचारांसाठी पाठवून दिले. या कार्यात संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, विवेक महंतशेट्टी, अश्वजीत चौधरी, वेंकटेश हवालदार, सूरज ओऊळकर, निलेश सूर्यवंशी, धीरज चंदगडकर, विकी शेणवे आदींनी भाग घेतला.

एकंदर फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या मदतीने एका असहाय्य वृद्ध महिलेला वेळीच उपचार मिळून तिचा जीव वाचला आहे हे कार्य प्रशंसनीय म्हणावे लागेल.

Tags: