श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी हिंडलगा तुरुंगाजवळ घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात कोकितकर यांच्या मानेजवळून गेलेली गोळी ड्रायव्हरच्या हातात घुसली. पण सुदैवाने दोघेही बचावले आहेत.
बेळगावात आज रविवारी श्रीराम सेनेतर्फे संभाजी उद्यानात विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन केले होते. काल शनिवारी सायंकाळी त्याच्या तयारीची पाहणी करून कोकितकर सहकाऱ्यांसमवेत हिंडलगा येथील आपल्या घरी परतत होते. साधारण सायंकाळी ७.३० ते ७.४५च्या दरम्यान, बेळगाव-वेंगुर्ला रोडवर हिंडलगा तुरुंगाजवळील स्पीडब्रेकरजवळ त्यांच्या कारचा वेग कमी झाल्यावर मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यावेळी कोकितकर ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. झाडलेली गोळी त्यांच्या मानेला घासून ड्रायव्हरच्या दंडात घुसली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोकितकर आणि त्यांच्या चालकाला केएलई इस्पितळात दाखल केले. दोघांवर तातडीने उपचार करण्यात आले. सध्या दोघेही धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी प्रसार माध्यमांना दिली.
या घटनेच्या तपासासाठी ४ विशेष पोलीस पथकांची स्थापना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी सांगितले. हा हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून झाला की, संघटनात्मक, राजकीय कारणावरून झाला याचा सखोल तपास करण्यात येईल. घटनेनंतर नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. कोकितकर यांनी आपला कोणावर संशय नसल्याचे सांगितले आहे. तरीही सर्व अंगांनी या घटनेचा तपास करण्यात येईल, दोषींना लवकरच गजाआड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर केएलई इस्पितळासमोर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.


Recent Comments