बेळगाव नेहमीच कुंद्याप्रमाणे गोड हे उत्स्फूर्त उद्गार आहेत हॅट्ट्रिक स्टार शिवराजकुमार यांचे ! आपल्या नव्या ‘वेदा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी आज बेळगावात आल्यानंतर ही प्रतिक्रया दिली. यावेळी चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात भव्य स्वागत केलं.

कन्नड चित्रपट सृष्टी सॅन्डलवूडमध्ये हॅट्ट्रिक स्टार म्हणून ओळखले जाणारे शिवराजकुमार यांनी आपल्या नव्या ‘वेदा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज कुंदानगरी बेळगावला सपत्नीक भेट दिली. त्यावेळी चाहत्यांच्या अमाप जनसागराने त्यांचे भव्य स्वागत केले. झांजपथक, वाद्यपथक, फटाक्यांची आतषबाजी करत शहराच्या चन्नमा चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवराजकुमार दाम्पत्याने कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
‘वेदा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शिवराजकुमार कुंदानगरीत पोहोचले आहेत. शहरातील चित्रा सिनेमा थिएटरला ते भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी चन्नम्मा सर्कल ते चित्रा सिनेमापर्यंत त्यांची रथातून भव्य मिरवणूक काढली. शिवराजकुमार यांचे चाहत्यांकडून भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराजकुमार यांनी, चित्रपटाच्या कथेबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे बेळगाव अल्वेज कुंदा तरा स्वीट ! अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले.
यावेळी शेकडोंच्या संख्येने चाहते उपस्थित होते.


Recent Comments