बेळगावातील प्रस्तावित रिंग रोडच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील गावोगावी जनआक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रस्तावित रिंग रोडला विरोध करण्यासंदर्भात बेळगावातील मराठा मंदिरमध्ये सोमवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी आमदार व मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. यावेळी रिंग रोडला विरोध करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. रिंग रोडला आपला कायम विरोध राहणार अशा आशयाचे निवेदन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले, रिंग रोडच्या विरोधात आता गावोगावी जनआक्रोश आंदोलन करण्याची सूचना पुढे आली आहे. त्यानुसार रिंग रोडमुळे ज्या ३२ गावातील १२७२ एकर सुपीक जमीन जाणार आहे त्या बेळगुंदी, झाडशहापूर, कलखांब, मुचंडी, मुतगा आदी गावातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून एकाचवेळी ४-५ गावात जनआक्रोश आंदोलन केले तरी चालेल. त्यादृष्टीने संपर्क मोहीम राबवण्यात येईल असे सांगून त्यांनी लढ्याची रूपरेषा सांगितली.
दिवंगत म. ए. समिती कार्यकर्त्यांना बैठकीत प्रारंभी आदरांजली वाहण्यात आली. तसेच कोल्हापुरात म. ए. समितीने केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल स्थानिक सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक व अन्य संघटनांचे आभार मानण्यात आले. बेळगावात मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून येणाऱ्या आमदारांनी रिंग रोडच्या विरोधात सरकारपुढे एक शब्दही काढला नसल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. बैठकीला माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जिपं सदस्या सरस्वती पाटील, मनोज पावशे, प्रकाश अष्टेकर, एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, मनोहर संताजी, कृष्णा हुंदरे, भागोजी पाटील आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments