Belagavi

सरकारकडून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न : प्रियांक खर्गे

Share

अधिवेशनाच्या नावाखाली पक्षाचे कार्यक्रम दामटण्यात भाजप नेते व्यस्त आहेत. भाजपला दुसऱ्यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही अशी टीका काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केली.

सुवर्णसौध येथे आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खर्गे म्हणाले, सिद्धरामय्या आणि आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. ती माध्यमातली अफवा आहे. भाजप नेत्यांनी त्याला खतपाणी दिले आहे. मतभेद विरोधी पक्षात नाहीत तर भाजपमध्ये आहेत. येडियुरप्पा विरुद्ध भाजप, यत्नाळ विरुद्ध निराणी, प्रतापसिंह विरुद्ध अश्वत्थ नारायण यांच्यात सुरू असलेल्या वादावर त्यांनी का बोलू नये? भाजपकडे भरपूर मतभेद आहेत. पण ते आमच्यात दोष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

अधिवेशनात काँग्रेसचा आवाज कमी झाला का? या प्रश्नावर आम्ही लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्य विषय पत्रिका सोडून पुरवणी विषय पत्रिका आणून सत्ताधारी भाजप अडवणूक करत आहे. परवा सिद्दरामय्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार होते. त्यादिवशीही तोच अनुभव आला. सुपारी उत्पादकांचे प्रश्न, शेतकऱ्यांची खतांची समस्या यावर ते बोलणार होते. नीलम संस्थेचा घोटाळा, सरकारचा 40% कमिशनचा घोटाळा, कल्याण कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकचे प्रश्न अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे होती. पण सत्ताधारी सदस्य गोंधळ घालतात किंवा सरकार पुरवणी विषय पत्रिका आणते. त्यामुळे सकारात्मक चर्चा होत नाही. अधिवेशनाच्या नावाखाली पक्षाचे कार्यक्रम राबवण्यात भाजप नेते व्यस्त आहेत असा आरोप त्यांनी केला.

एकंदर, सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रियांक खर्गे यांनी केला आहे.

Tags:

priyank-kharge-speaks-against-bjp/