Belagavi

अयोध्येच्या धर्तीवर कर्नाटकात उभारणार राममंदिर : मंत्री अश्वत्थनारायण

Share

उत्तर प्रदेशातील अयोध्येत जसे भव्य राममंदिर बांधले गेले तसे दक्षिण भारतात कर्नाटकात राम मंदिर बांधण्यात येईल, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री सीएन अश्वत्थनारायण यांनी दिली. राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

बेळगावात बुधवारी सुवर्णसौध येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री अश्वत्थनारायण म्हणाले की, कर्नाटकात राम मंदिर उभारणीची घोषणा पुढील अर्थसंकल्पात केली जाईल. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी येऊन जागेची पाहणी करणार आहेत. दक्षिण कर्नाटकात पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटकात येत आहेत. त्यामुळे मंड्यामध्ये बूथस्तरीय अधिवेशन होणार आहे. अमित शाह यांच्या येण्याने नव्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत असा दावा करून, निवडणूक आयोग ठरलेल्या वेळी तारीख जाहीर करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या येण्याचा आणि निवडणुकीशी काहीही संबंध नाही. जेडीएस आणि काँग्रेस अनेक दशकांपासून मंड्यावर राज्य करत आहेत. पण, विकास शून्यच आहे. विविध क्षेत्रात राज्यासाठी आदर्श ठरलेल्या मंड्या जिल्ह्याने शेतीत प्रगती केली असली तरी त्याला या पक्षांनी कोणत्या स्तरावर नेऊन ठेवले आहे? माय शुगर साखर कारखाना बंद पडला आहे. तो आम्ही पुन्हा सुरू करत आहोत. मंड्यामध्ये विद्यापीठे आणि नवे उद्योग सुरू करू.

काँग्रेस आणि जेडीएसवर विश्वास ठेवून लोक पस्तावले असल्याचा टोला त्यांनी लगावला. डबल इंजिनचे सरकार सर्व वर्ग आणि वंशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. दक्षिण कर्नाटकाला न्याय मिळवून देण्याचे काम भाजप करत आहे. आमचे सरकार केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाही असे मंत्री अश्वत्थ नारायण म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोविडचे व्यवस्थापन केले जात आहे. या प्रकरणी आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव नाही असा दावा त्यांनी केला.

एकंदर जेडीएस आणि काँग्रेसच्या बालेकिल्ला मंड्यात जोरदार मुसंडी मारण्याची तयारी भाजपने केली असल्याचे संकेत उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांनी दिले आहेत.

Tags:

ram-mandir-in-karnataka-minister-ashwathnarayan/