केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे चांगले कसलेले खेळाडू आहेत, ते कोणत्याही खेळपट्टीवर चांगले खेळू शकतात असे आ. सी. टी. रवी यांनी सांगितले.
सुवर्णसौधसमोर आज बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सी. टी. रवी म्हणाले, जुन्या म्हैसूरमध्ये अमित शहांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. अमित शाह देशातील कोणत्याही मैदानावर खेळत असले, तरी आम्ही मुख्यतः जुन्या म्हैसूरवर लक्ष केंद्रित करत आहोत. चिक्कमगळूरू हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता तिथे पंचायत ते संसदेपर्यंत सर्वत्र भाजप आहे. अमित शहा येत्या काही दिवसांत मंड्याला भेट देणार आहेत. आम्ही मंड्या, कोलार, चिक्कबळ्ळापूर येथेही येऊ, मंड्या ही कोणाची जहागीर नाही, कुमारस्वामींनाही हे माहीत नाही, कोणताही जिल्हा कोणाच्याही बापाचा नाही. लोकशाहीत जहागीर निर्माण होणे शक्य नाही, आमचे फक्त 5 जिल्हे आहेत आणि आम्ही ते घेऊ असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे डीकेशींना टोला हाणला.
देवेगौडा पंतप्रधान झाल्यापासून हासन येथे विमानतळाचे स्वप्न होते. मात्र विमानतळ करण्यासाठी डबल इंजिन सरकारला यावे लागले. बेळगावच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकावर चर्चा झाली नाही, या प्रश्नाला उत्तर देताना रवी म्हणाले की, हे अधिवेशन केवळ उत्तर कर्नाटकापुरते मर्यादित नसून हे अधिवेशन सर्वसमावेशक कर्नाटकाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर कर्नाटकावर चर्चा होणार आहे असे रवी यांनी सांगितले.
एकंदर, मंड्या आणि जुन्या म्हैसूरचा गड जिंकण्यासाठी अमित शाह यांच्यासारख्या कसलेल्या पैलवानाला घेऊन एखाद्याची तयारी भाजपने सुरु केल्याचे संकेत सी. टी. रवी यांनी दिले आहेत.


Recent Comments