Belagavi

आरक्षणासाठीची निवेदने मागासवर्ग आयोगाकडे : मुख्यमंत्री बोम्मई

Share

ओक्कलिगासह सर्व मागास समाजांचे आरक्षण वाढवण्यासाठी देण्यात आलेली निवेदने पुढील कार्यवाहीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

ओक्कलिगा समाजाच्या आरक्षणाची रक्कम वाढवावी यासाठी ओक्कलिगा समाजाचे मंत्री आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव येथील सुवर्णसौध येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन दिले. ते स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आज आमच्या पक्षाच्या ओक्कलिगा समाजाच्या मंत्री व आमदारांनी ओक्कलिगा समाज शिक्षण व उद्योगसह अनेक बाबतीत मागास राहिला आहे, समाजाची लोकसंख्या वाढली आहे, त्या प्रमाणात समाजाचे आरक्षण वाढविण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

त्याचप्रमाणे हुंचीटगार समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन यापूर्वी डॉ. निर्मलानंद स्वामीजींच्या नेतृत्वाखालीही निवेदन मला देण्यात आले होते. ते मी 29 नोव्हेंबरला मागासवर्ग आयोगाकडे कार्यवाहीसाठी पाठवून दिले आहे. हुंचीटगार समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा जरा किचकट आहे. कारण या समाजाचा समावेश केंद्र सरकारच्या मागास यादीत नाही. आरक्षण देणे किंवा वाढवणे यात राज्याच्या कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी, अहवालाची भूमिका महत्वाची असते. त्याच्या अहवालावरच सर्व काही अवलंबून असते. त्यामुळेच आकांक्षी समाजांकडून देण्यात आलेली निवेदन आयोगाला पाठवून देऊन अहवाल मागवण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

यावेळी मंत्री आर. अशोक, डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण, अरग ज्ञानेंद्र, के. गोपालय्या, एस. टी. सोमशेखर, डॉ. सुधाकर, डॉ. नारायण गौडा आणि आमदार उपस्थित होते.

Tags:

minister-appeal-to-cm-for-vokkaliga-reservation/