विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा , विजया आर्थो अँड ट्रामा सेंटर तसेच डॉ . रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज , हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने , विजया सेवा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .
शुक्रवारी , शहरातील , केपीसीएल समुदाय भवनामध्ये ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी , कारंजीमठाचे श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी तसेच हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या दिव्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून , बेळगावचे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ तसेच आ . पी राजीव , बसवराज रोटी आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले . यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा तसेच निवृत्त जवानांचा यावेळी विजया सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले कि , समाजाचे आरोग्य चांगले राखण्यात डॉक्टरांची प्रमुख आणि महत्वाची भूमिका आहे .डॉ . रवी पाटील आरोग्य क्षेत्रात उत्तम सेवा देत आहेत . त्याबरोबरच त्यांनी सामाजिक जाणिवेतून आज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला हे कौतुकास्पद आहे . समाजात डॉक्टरांना खूप मोठे मानाचे स्थान आहे . कोविड काळातदेखील डॉक्टरांनी दिलेली सेवा ही वाखाणण्यासारखी आहे. समाजासाठी जो काम करतो तोच खरा श्रेष्ठ अशा शब्दात त्यांनी डॉ . रवी पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले .

आ . पी. राजीव म्हणाले कि , देशात पुन्हा कोरोनाची संभाव्य लाट आहे . अनेक देशांनी कोरोनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला घाबरून लॉकडाऊन केले होते . मात्र आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृदृष्टी आणि , सरकारने पुरवलेली आरोग्य सुविधांमुळे आज आपल्या भारत देशात इतर देशांप्रमाणे परिस्थती नाही . जरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही , जनतेने सरकार आणि आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून खबरदारी घ्यावी . यावेळी त्यांनी डॉ . रवी पाटील यांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसा व्यक्त केली .
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर , त्यांचे कुटुंबीय आणि अन्य निमंत्रित उपस्थित होते .


Recent Comments