Belagavi

बेळगावात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्पासाठी प्रयत्न : निराणी

Share

बेळगाव जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, बेळगावात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा रशियन कंपनीचा प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती बृहत व मध्यम उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी विधानसभेत दिली. आ. अभय पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी, बेळगावच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा मांडला. सरकार बियाँड बेंगळूर म्हणते, पण बियाँड हुबळीच्या पुढे, बेळगावला ही संकल्पना येऊन पोहोचलेलीच नाही. नवे उद्योग नाहीतच पण असलेल्या उद्योगांनाही सुविधा सरकार पुरवत नाही. त्या तुलनेत महाराष्ट्राकडून कागल, कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत अधिक सुविधा पुरण्यात येत आहेत. त्यामुळे येथील असलेले उद्योग तिकडे स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. परिणामी स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणे कठीण झाले आहे. अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली. येथे येऊन केवळ भाषण देऊन गेल्याने काही होणार नाही. बेळगावात उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करा, असलेले उद्योग टिकले पाहिजेत तसेच नवे उद्योगही आले पाहिजेत. नव्या आणि असलेल्या उद्योगांना सुविधा-सवलती देण्यासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी आ. अभय पाटील यांनी केली.

यावर उत्तर देताना उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी, बेंगळूरमध्ये एका रशियन इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीने आपला प्रकल्प सुरु करण्याची इच्छा दर्शवली होती. पण आम्ही त्यांना बेळगाव, हुबळी-धारवाड किंवा कलबुर्गी येथे प्रकल्प सुरु केल्यास अधिक सुविधा देण्याची तयारी दर्शवली. खासकरून बेळगावात हा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दोन हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. तो बेळगावात सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे बेळगाव फौंड्री उद्योगासाठी प्रसिद्ध असल्याने या उद्योगाच्या विकासासाठी तसेच नवे उद्योग सुरु करण्यासंदर्भात आ. अभय पाटील यांच्याशी चर्चा करून सरकार पावले उचलेल असे आश्वासन मंत्री निराणी यांनी दिले.

याचवेळी आ. अनिल बेनके यांनी बेळगावात आयटी पार्क सुरु करण्यासाठी काकती परिसरात केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली ७०० एकर जमीन ताब्यात घेऊन आयटी पार्क सुरु करण्याची मागणी केली. बेळगाव परिसरात आयटी इंजिनिअर्सची संख्या अधिक आहे. मात्र रोजगारासाठी त्यांना पुणे किंवा बेंगळूर गाठावे लागते. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी येथे आयटी पार्क सुरु करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Tags: