महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा दडपशाहीने रोखून कर्नाटकाने केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ समितीने आता महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या 26 डिसेंबरला ‘चलो कोल्हापूर’चा नारा देण्यात आला असून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज बेळगावात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रत्युत्त देण्यासाठी बेळगावात 19 डिसेंबरला समितीने महामेळावा आयोजित केला होता. त्यासाठी महाराष्ट्रातील नेते येणार होते. मात्र कर्नाटकी पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू करून दडपशाही करत महामेळावा होऊ दिला नाही. याचा निषेध करून पुढील रणनीती ठरविण्यात आली. यापुढे बेळगावात आंदोलन केल्यास कर्नाटक सरकार दडपशाही करेल, येथील युवकांवर खोट्या केस दाखल करेल, म्हणून महाराष्ट्र सरकारने घ्यावी, केवळ मराठी भाषिकांना पाठिंबा देणारे ठराव न करता, कृतिशील पाऊल उचलावे, सीमाप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी तसेच महाराष्ट्र बंदची हाक द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.

या मागण्या महाराष्ट्र सरकारपुढे मांडण्यासाठी येत्या 26 डिसेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्याची विनंती करण्याचे ठरले. कर्नाटक सरकार कशा पद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करते याची माहिती दिल्ली दरबारी पाठवण्याची विनंती करणार असल्याचे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बैठकीत सांगितले.
कोल्हापुरातील आंदोलनासाठी येत्या 26 डिसेंबरला सकाळी शिवाजी उद्यानात जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कूच करण्याचे ठरले. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकांनी जमावे असे आवाहन करण्यात आले. बैठकीला मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.


Recent Comments