Belagavi

हानगल कुमारस्वामीजींवरील चित्रपटाचा ट्रेलर, ध्वनिफीत रिलीज

Share

धार्मिक आणि संगीत शिक्षणातून ग्रामीण कर्नाटकाचा शैक्षणिक आणि धार्मिक पाया मजबूत करण्याचे महान कार्य हानगल कुमारस्वामीजींनी केले. त्यांचे कार्य समाजापुढे नेण्यासाठी त्यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे, त्याला मी शुभेच्छा देतो असे उद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढले.

बेळगावात लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानावर आज मंगळवारी हानगल कुमारस्वामीजींच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ध्वनिफीत आणि ट्रेलरचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ, आनंद हावण्णावर, अरविंद पाटील, विविध मठाधीश आदी उपस्थित होते. प्रारंभी बोम्मई यांच्याहस्ते ध्वनिफीत तर येडियुरप्पा यांच्याहस्ते ट्रेलर रिलीज करण्यात आले.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कर्नाटकात बाराव्या शतकात जी न भूतो सामाजिक, धार्मिक क्रांती झाली, तिची परंपरा पुढे नेण्याचे महान कार्य शिवयोगी हानगल कुमारस्वामी आणि त्यांच्या शिवयोगी मंदिरांनी, त्यांच्या स्वामीजी, अध्यात्मिक गुरूंनी केले. सामाजिक चिंतनाचा एक नवा विचार या शिवयोगी मंदिरांनी मांडला. ही शिवयोगी मंदिरे नसती तर आज समाजाला मार्गदर्शन करणारे स्वामीजी, अध्यात्मिक गुरु इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाले नसते.

वीरशैव लिंगायत समाज हा चिंतनशील आणि कालानुरूप बदल अंगिकारणारा सक्रिय समाज आहे असा गौरवपूर्ण उल्लेख करून या समाजाच्या जडणघडणीत शिवयोगी हानगल कुमारस्वामी आणि त्यांच्या शिष्यांचे मोठे योगदान आहे. या समाजाचा भक्कम पाया त्यांनी घातला. अ. भा. वीरशैव महासभेचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. कर्नाटकात निपाणी-चिक्कोडीपासून ते कोलेगळपर्यंत ग्रामीण भागात शिक्षण, दासोह, सामाजिक चिंतन अशा विविध पातळ्यांवर वीरशैव लिंगायत मठांचे मोठे योगदान आहे. हानगल कुमारस्वामी यांचा संदेश, कार्य पुढे नेने हे आपले कर्तव्य आहे. या हेतूने त्यांच्यावर चरित्रात्मक चित्रपट बनवून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा हेतू स्तुत्य आहे. हा चित्रपट पाहून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री बोम्मई यांनी व्यक्त केला.

यावेळी अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्री बोम्मई, येडियुरप्पा आदींचा शाल घालून, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: