ऐतिहासिक निर्णय घेऊन विणकरांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा आज बेळगाव येथील सुवर्णसौध सभागृहात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
बेळगाव शहरासह आसपासच्या तालुक्यांतील विणकर, कुरुविनशेट्टी, देवांग, हातगर देवांग समाज, स्वकुळसाळी समाज, नामदेव शिंपी यांच्यासह विविध समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल पांघरून व पुष्पहार अर्पण करून सत्कार केला.

सत्कार स्वीकारून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी विणकरांकडून समाजासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विणकरांची वस्त्रोद्योगातील पारंपरिक कौशल्य जतन करण्यासह त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांचे जीवनमान उंचावण्याची गरज आहे. या दृष्टीने आमचे सरकार प्रयत्नशील असून, विणकरांच्या उत्थानासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी विणकरांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहून पाठपुरावा केला. त्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विणकरांसाठी अनेक क्रांतिकारी योजना मंजूर करणारे ते कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री आहेत. यासाठी संपूर्ण विणकर समाज त्यांचा ऋणी राहील असे गौरवोद्गार आ. अभय पाटील यांनी काढले.

यावेळी धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, कर्नाटक हातमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष व तेरदाळचे आमदार सिद्धू सवदी, कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर, आ. दोड्डनगौडा पाटील आदींची भाषणे झाली. जलसंपदा मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, आ. अनिल बेनके, वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष सुरेश कित्तूर, विणकर व इतर समाजाचे नेते दुंडाप्पा माचकनूर बनहट्टी, शंकर तिरकी, प्रभू करलट्टी, गंगाप्पा मलजगी, आनंद कंपू, मल्लाप्पा संगनट्टी, जी. एस. गोम्बी, एम. पी. बेंगोडी, चंद्रकांत हासिलकर, मोहन कोपर्डे यांच्यासह बेळगाव, निप्पाणी, तेरदाळ, इलकल, कित्तूर मतदारसंघातील नेकार विणकर समुदायातील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments