19 डिसेंबरला सुरु होणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाचा आवाज सदनात आणि सदनाबाहेरही घुमणार आहे . 20 डिसेंबरला कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा फेडरेशन कर्नाटकातील सकल मराठा समाजाकडून सुवर्णसौध समोर मराठा समाजाच्या भव्य मेळावा आयोजित केला जाणार असून सुवर्णसौधला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती , मराठा समाजाचे नेते तसेच भाजप ओबीसी राज्य मोर्चा सचिव किरण जाधव यांनी दिली .
रविवारी या संदर्भात शहरात पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली . यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी सांगितले कि , मराठा समाजाला ३ बी मधून २ ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी , आम्ही मागील बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहोत .आमच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेऊन , आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही येत्या २० डिसेंबरला , मराठा समाजाचे परमपूज्य मंजुनाथ स्वामीजी, शामसुंदर गायकवाड तसेच आजी माजी आमदार आणि नेत्यांच्या नेतृत्वाखाली विराट मेळावा आयोजित करीत आहोत . सुवर्णसौधसमोर हा विराट मेळावा होणार असून , जवळपास 25 हजाराहून अधिक मराठा समाज बांधव यात सहभागी होणार आहेत . आम्ही गेल्या महिनाभरापासून या मेळाव्याची तयारी करीत आहोत . सदनाबाहेर मराठा समाज बांधव तसेच सदनाच्या आत मराठा समाजाचे आमदार आरक्षणासाठी आवाज उठवणार आहेत . मराठा समाजातील सर्वानाच या आरक्षणाचा फायदा होणार आहे . असे ते म्हणाले.
यावेळी मराठा समाजाचे नेते विनय कदम यांनी सांगितले कि , 2010 सालच्या शंकरप्पा आयोगाच्या शिफारसीनुसार वाल्मिकी समाजाला जे आरक्षण दिले आहे त्याप्रमाणे आरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही करीत आहोत . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जर ते शक्य नसेल तर किमान 2 ए मध्ये आरक्षण द्यावे . मराठा समाज शैक्षणिक ,सामाजिक, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे . आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत जोरदार मांडला जावा यासाठी विधानसौधबाहेर आंदोलन करून दबाव टाकणार आहोत .
नारायण झंगारूचे यांनी सांगितले कि आतापर्यंत आम्ही राजकीय किंवा अन्य कोणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले पण आता जनता पेटून उठली आहे . मराठी आणि कन्नड मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शैक्षणिक , आर्थिक आणि सामाजिक उन्नती होणार नाही . या मेळाव्यासाठी अमी गावोगावी आव्हानात्मक विनंती करीत होतो . या विराट मेळाव्याचा सरकारवर दबाव आणण्यासाठी आणि सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा बांधवानी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
पत्रकार परिषदेत , कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष वैभव कदम , युवा नेते धनंजय जाधव , जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर , राज्य कार्यदर्शी विठ्ठल वाघमोडे , गणपत पाटील , संजय पाटील , बंडू कुद्रेमनीकर ,आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .


Recent Comments