Belagavi

आरक्षण संघर्ष समितीचे उद्यापासून बेळगावात धरणे : केशवमूर्ती

Share

न्या. ए. जे. सदाशिव अहवालाची केंद्र सरकारला शिफारस करण्यासाठी सामाजिक न्यायासाठी अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण अंमलबजावणी संघर्ष समितीतर्फे सोमवारपासून बेळगावात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे प्रदेशाध्यक्ष केशवमूर्ती यांनी सांगितले.

बेळगावात रविवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केशवमूर्ती यांनी सांगितले की, न्या. सदाशिव यांच्या अहवालाची शिफारस केंद्र सरकारकडे तातडीने करण्याबाबत सभागृहात निर्णय झालेल्या अहवालाची माहिती सरकारने संघर्ष समितीला द्यावी. न्या. नागमोहन दास आणि न्या. कांतराज अहवाल स्वतंत्रपणे जाहीर करून त्याची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदाशिव आयोगाच्या अहवालात दुसऱ्या कुठल्या जातीचे आरक्षण काढून घेण्याचे निर्देश नाहीत.

मादिग समाजाची अवस्था आज अस्पृश्यांतील अस्पृश्यांसारखी झाली आहे. या समाजाच्या उत्थानासाठी आयोगाचा अहवाल अमलात आणण्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. बेळगावात विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन हाती घेत आहोत असे केशवमूर्ती म्हणाले.

यावेळी अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: