Belagavi

बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही : शंभूराज देसाई

Share

बेळगाव दौरा अद्याप रद्द केलेला नाही. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्यावरुन सुरु असलेल्या चर्चांबाबत भाष्य केलं. 6 तारखेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा सहा तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवलं आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या घटकेला आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले मंत्री घाबरले आहेत, असा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, मंत्री बिलकुल घाबरत नाहीत. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकतो. पण आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे. हे प्रकरण चिघळू न देता, समन्वयातून यामधून तोडगा काढायचा आहे. केंद्राने यात मध्यस्थी करावी आणि समन्वयातून दोन्ही राज्यांमधील हा प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आततायीपणा करुन, कायदा हातात घेऊन आम्हाला हे प्रकरण चिघळवायचं नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, ही तिथल्या नागरिकांची जी भावना आहे, त्या भावनेच्या पाठिशी आम्ही आहोत असे त्यांनी सांगितले.

Tags:

Shambhuraj Desai On Belgaon Visit