बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी शनिवारी आयोजित केलेल्या फोन-इन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
होय, शनिवारी एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या फोन-इन कार्यक्रमात, सरकारी महिला अधिकाऱ्याला एका यूट्यूब चॅनलचा पत्रकार पैशासाठी त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली. गट क महिला अधिकाऱ्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत आपली कैफियत एसपींपुढे मांडली. याला उत्तर देताना एसपी डॉ. संजीव पाटील यांनी, तुम्हाला धमकावणाऱ्या यूट्यूब चॅनलच्या रिपोर्टरविरुद्ध न घाबरता पोलिसात तक्रार करा, पोलीस कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करतील, त्यासाठी आधी तक्रार करा, असे सूचवले. त्यावर उत्तर देताना महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून तक्रार दाखल करेन असे सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी आजही बेकायदेशीरपणे दारूची विक्री सुरू आहे. याला आळा घालण्याचे आवाहन रायबाग येथील व्यक्तीने केले. यावर उत्तर देताना एसपी म्हणाले की, गेल्या वेळी फोन-इन कार्यक्रमात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांविरोधात आवाज उठवला होता. त्यावरून कारवाई करून काही अवैध बार बंद करण्यात आले आहेत. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सून व मुलाने छळ करून रामदुर्ग तालुक्यातील नागनूर गावातील वृद्ध महिलेला घरातून हाकलून दिले आहे. घर मुलाच्या नावावर करण्यासाठी त्रास दिला जात असल्याची तक्रार महिलेने फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. त्याला उत्तर देताना एसपी डॉ. संजीव पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस कारवाई करतील, असे आश्वासन दिले.
एकंदरीत एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या फोन-इन कार्यक्रमाला जनतेचा आणि अधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी, डीवायएसपी वीरेश दोडमणी, सीपीआय बी. आर. गड्डेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments