आम्हाला आमच्याच टीचर परत द्या ! , नवीन गुरुजी नकोत अशी मागणी करत बेळगाव येथील पंडित नेहरू पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
होय, बेळगावातील शहापूर अळवण गल्ली येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या असंख्य विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगळ्याच कारणासाठी ठिय्या आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. या विद्यार्थ्यांनी आंदोलन का केले माहीत आहे का? या महाविद्यालयात अकाउंट्स आणि बिझनेस स्टडी शिकवणाऱ्या धनश्री गरडे या अतिथी शिक्षिका यांच्या जागी शासनाने दुसऱ्या शिक्षिकेची कायमस्वरूपी नियुक्ती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आम्हाला दुसरे काही नको आहे. पूर्वीचेच शिक्षक द्या, या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बोलताना विध्यार्थ्यानी सांगितले की, आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला दुसरे काहीही नको आहे. चार-पाच वर्षे ते चांगले शिकवत होते. आई-वडिलांप्रमाणे आमची काळजी घेत. कुणी गुटखा-तंबाखू खाल्ले तर ते त्यांची समजूत घालून त्यांचे व्यसन सोडवत. कोणी कॉलेजमध्ये आले नाही तर घरी जाऊन कॉलेजमध्ये बोलावून आणायचे. त्याने आम्हा सर्वांवर खूप प्रेम केले. अशा शिक्षकाला कसे बदलता येईल, अशी त्यांनी व्यथा मांडली.
श्रेयस कुंडेकर, वाटिका खन्नूकर, वैष्णवी बेन्नाळकर, स्मिता पाटील, अवंतिका झंगरुचे यांच्यासह शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments