देशातील बहुतांश खासगी शैक्षणिक संस्था कौटुंबिक परंपरेनुसार पुढे जात असताना, लोकशाहीच्या पायाभूत तत्वांवर शिक्षण देणारी केएलई ही एकमेव संस्था आहे अशा शब्दांत कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी समाधान व्यक्त केले.
कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्थेच्या (केएलई ) 107वा स्थापना दिन आज शनिवारी केएलई शताब्दी सभागृहात उत्साहात पार पडला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बोलताना डॉ. कोरे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व १९व्या शतकातील कठीण काळात केएलई संस्थेची स्थापना करणाऱ्या सप्त ऋषींना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. मुल्की परीक्षेत जिल्ह्यात पहिला येऊनही पुढील शिक्षणासाठी धडपड करून महाराष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेत उच्च शिक्षण घ्यावे लागले होते. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये म्हणून त्यांनी केएलईची स्थापना केली. सुरुवातीला मुलांना घरीच खाऊ घालून संस्थेच्या सामाजिक चिंतनाचा पाया त्यांनी घातला. आज या संस्थेमध्ये विविध जाती-धर्माचे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी धर्मनिरपेक्ष शिक्षण घेत आहेत ही अभिमानाची बाब आहे असे ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, केएलई संस्था समाजात यशाची शिडी चढण्यासाठी एक पायरी म्हणून काम करत आहे. केएलईच्या संस्थापक सप्तर्षींनी संस्थेची बांधणी केल्यामुळे संस्थेचे आठवे ऋषी डॉ. प्रभाकर कोरे यांनी संस्थेचा जागतिक स्तरावर विस्तार केला. संस्थेने गुणात्मक शिक्षणाने लाखो हुशार विद्यार्थी घडवून राष्ट्र उभारणीत मदत केली आहे. डॉ.प्रभाकर कोरे यांचे या क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके म्हणाले, केएलई संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे ही प्रभाकर कोरे यांच्या कार्याची पावती आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा या केवळ शहरी भागापुरत्या मर्यादित नसून केएलई ग्रामीण भागातही तळागाळातही या सेवा पुरवते. संस्थेचा विस्तार आणखी होऊ दे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

केएलईचे अध्यक्ष व बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे कार्याध्यक्ष एम. एस. बळीगार, सचिव डॉ. बी. जी. देसाई, संचालक डॉ. व्ही. एस. साधुनावर, डॉ. विश्वनाथ पाटील, बाबन्ना मेटगुड आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments