Belagavi

बेळगाव कलामंदिरच्या आवारातील ती इमारत अखेर जमीनदोस्त

Share

बेळगावातील कलामंदिरच्या आवारातील 25 वर्षांपासून वादात असलेल्या इमारतीवर अखेर बेळगाव महापालिकेने आज हातोडा हाणला. जेसीबीच्या सहाय्याने ही इमारत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली.

होय, बेळगावात काँग्रेस रोडचे रुंदीकरण करताना बेळगाव महानगरपालिकेने टिळकवाडी परिसरातील अनेक इमारतींवर हातोडा हाणला होता. त्यावेळी काही नागरिकांनी पालिकेच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. काहींनी अतिक्रमण पाडण्याचा विरोध केला तर काहींनी नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावेळी बेळगाव मनपाने भरपाई देता येत नसल्याची भूमिका घेतली. याचवेळी कलामंदिरच्या आवारातील एक इमारत पाडण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट झाल्याने गेली 25 वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या इमारतीचे मालक भट यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने नगरप्रशासन खात्याला याबाबत सूचना केली होती. खात्याने निर्देश दिल्यावर बेळगाव मनपाने रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईत भरपाई देण्याची तरतूद नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर काल, सोमवारी हायकोर्टाने या प्रकरणी निकाल दिला.

निकालाची परत मिळवण्यासाठी मनपा अधिकारी काल दिवसभर धारवाड हायकोर्ट बेंचमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी टिळकवाडी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अखेर या इमारतीवर जेसीबी फिरवण्यात आला. तत्पूर्वी भट यांना बाहेर बोलावण्यात आले. मात्र ते यायला तयार नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी आतील साहित्य हटवून इमारत पाडली.
बेळगाव मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या प्रमुख मंजुश्री यांच्या नेतृत्वाखाली पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags:

belgaum corporation demolish building in kalamandir premises