हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावात एका असहाय्य आजीचा खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी बेळगाव येथील आपल्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 7 ऑक्टोबर रोजी बेल्लद बागेवाडी येथील एका घरात मल्लव्वा जीवाप्पा कमते या 75 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी 13 ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत महिलेचे वय 75 वर्षे होते. सुमारे 10 वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. वर्षभरापूर्वी तीन मुले आणि तीन मुली वेगळे होऊन बेल्लद बागेवाडी गावात एका छोट्या खोलीत त्या राहत होत्या. त्या महिलेला रोज संध्याकाळी तिचा नातू बेल्लद बागेवाडी गावापासून चार कि.मी. दूरवरून येऊन जेवण देऊन जायचा. तो जेवण देण्यासाठी आला असता त्याला आजीचा मृतदेह आढळून आला. हुक्केरी सीपीआय मोहम्मद रफिक तहसीलदार आणि गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तपास केला. खुनानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
जमीन नावावर करण्याच्या मुद्द्यावरून आई आणि मुलांमध्ये मतभेद होते असे भासविण्यासाठी, मुलांवर संशय यावा, या हेतूने घरातील कागदपत्रांची पिशवी मुलांच्या घरासमोर ठेवली होती. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. यातील पहिला आरोपी 7 वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात सहभागी होता. त्या प्रकरणातही त्याने दोरीने गळा आवळून खून केला होता. दुसरा आरोपी रायबाग तालुक्यातील नंदीकुरळी गावचा आहे. पहिल्या आरोपीने खून केलेल्या आजीकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. यावेळी वृद्ध महिलेने त्याच्याशी हुज्जत घातली आणि व्याज नाही तर मुद्दल परत करण्याची मागणी केली. दुसऱ्या आरोपीने पहिल्या आरोपीकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. दसऱ्याच्या वेळी दोघांनीही आजीच्या खुनाचा कट रचला.
या आजीने अनेकांना कर्ज दिले आहे. तिच्या घराची झडती घेतली तर भरपूर पैसे सापडतील, असे वाटल्याने 6 ऑक्टोबर रोजी ते आजीच्या घरी आले आणि पैशांच्या विषयावर चर्चा केली. त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. शौचालयात भरपूर पाणी होते. या दोघांच्या मदतीने आजीने ते पाणी बाहेर ओतले. त्यानंतर या दोघांना चहा दिला. उशीर झाला म्हणून नंतर आजीने त्यांची तिथेच झोपण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आजी झोपली असताना दुसऱ्या आरोपीने आजीचा पाय धरला, पहिल्या आरोपीने दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर, त्यांनी काहीतरी शोधण्यासाठी घरभर शोधाशोध केली, 20 ग्रॅम सोन्याशिवाय त्यांना काहीही सापडले नाही. घरातील कागदपत्रे आजीच्या मुलांच्या घरासमोर टाकून आरोपी पळून गेले.
आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली दोरी आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करणे बाकी आहे. या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. आरोपींसोबत अजून कोणी सामील आहे का..? याचा तपास करत असल्याची माहिती एसपी डॉ. संजीव पाटील यांनी दिली.
या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल एसपी डॉ. संजीव पाटील यांनी हुक्केरी पोलिसांचे अभिनंदन केले.


Recent Comments