Agriculture

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा रिंग रोड प्रकल्प रद्द करा : म. ए. समितीची मागणी

Share

बेळगाव तालुक्यातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा रिंग रोड प्रकल्प रद्द करा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. या मागणीचे निवेदन आज समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

होय, बेळगाव तालुक्यातील ३४ गावातील सुपीक जमीन रिंग रोडसाठी संपादित करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बेळगाव तालुक्यातील ३४ गावातील सुपीक शेतजमीन संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. येथील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केवळ याच जमिनीवे अवलंबून आहे. त्यामुळे जमिनी गेल्यास शेतकरी देशोधडीला लागतील अशी भीती निवेदनात व्यक्त केली आहे. दहा दिवसांच्या आत सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा अन्यथा २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर, टेम्पो मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, विकास कलघटगी, सुनील अष्टेकर, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. अमर येळ्ळूरकर, एस. एस. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, मनोज पावशे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: