केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या ‘हिंदू’ शब्दाच्या अर्थाबाबतच्या विधानावरून रन माजवलेल्या भाजप, हिंदुत्ववादी संघटनांविरोधात सतीश यांच्या समर्थकांनी आणि विविध दलित संघटनांनी आज बेळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विशाल निषेध सभा घेऊन त्यांनी विरोधकांना आम्ही सर्व सतीश जारकीहोळी यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे.

होय, सतीश जारकीहोळी यांच्या हिंदू वक्तव्याविरोधात आकाशपाताळ एक करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांच्या चाहत्यांनी आज अक्षरश: एल्गार पुकारला. सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात पद्धतशीर कट रचल्याचा आरोप करत त्यांचे चाहते आणि विविध दलित संघटनांनी बेळगावच्या सीपीएड मैदानापासून भव्य मोर्चा काढला. या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात सतीश यांच्या समर्थनार्थ मजकुराचे फलक घेऊन घोषणाबाजी करत मंत्री शशिकला जोल्ले, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारो आंदोलन करत त्या जाळल्या.
भगवा, निळा आणि लालपिवळा कन्नड ध्वज हाती घेऊन, रंगीत शाली परिधान करून सतीश जारकीहोळी यांचे चाहते भव्य निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वीरराणी चन्नम्माजी सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. गोकाक येथील पंचमसाली सभेत सतीश जारकीहोळी यांच्यावर जहरी टीका केलेल्या भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या विरोधात सतीश यांच्या चाहत्यांनी जोरदार संताप व्यक्त करत त्यांच्या विरोधात अश्लील घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना रवींद्र नाईक म्हणाले की, सतीश जारकीहोळी हे दलित, शोषित वर्गातून आले आहेत. पीडित आणि गरिबांसाठी आवाज उठवतात. त्यांचा आवाज दाबण्याचा उद्देशाने त्यांच्या विधानाचा विपर्यास करून राज्यभर आणि देशात अपप्रचार करून त्यांचा मानभंग करण्याच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध आणि तिरस्कार करतो. त्यांनी भगवान बुद्धांना देशातून हाकलून दिले, कल्याण क्रांतीनंतर बसवण्णांना निर्वासित केले आणि लाखो शरणांची हत्या केली. आंबेडकरांना त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत दुखावले आणि त्यांचा अपमान केला. त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा पद्धतशीर प्रयत्न देशात सुरू आहे. पण आम्ही मागासलेले लोक आता जागरूक झालो आहोत. तुमच्या विरोधातली आमची लढाई इथेच थांबवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शेतकरी नेते सिदगौडा मोदगी यांनी सर्वप्रथम अंगणवाडीतील मुले जेवत असताना, देशभरात जमिनीची विक्री सुरू असताना, शेतकरी आल्यावर तुमची चर्चा कुठे गेली, असा सवाल केला. या आणि यावर मोकळेपणाने चर्चा करा. केवळ तुमच्या पक्षातच हिंदू नाहीत, सर्व पक्षांमध्ये हिंदू आहेत. याबाबत त्यांच्यात चर्चा होत नाही. पण फक्त तुमच्यातच का यावर चर्चा होत आहे. तुम्ही येऊन चर्चा करायला हवी होती. तुमचे स्वत:चे डबल इंजिन सरकार सत्तेत आहे, चौकशी समिती स्थापन करा, सर्व विद्यापीठांतील तज्ज्ञ येऊन चर्चा करू द्या. सामाजिक संघर्षाला किंमत द्यावी लागेल. या चळवळीला येथून सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजशेखर तळवार म्हणाले, अभय पाटील यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये हिंदू शब्द असेल तर आम्ही 10 लाख रुपये देऊ. सतीश जारकीहोळी यांच्या जन्म दाखल्यात हिंदू वाल्मिकी असा उल्लेख आहे. सतीश जारकीहोळी हे कट्टर हिंदू आहेत. अभय पाटील हे बोगस हिंदू आहेत. बोगस हिंदू येऊन खऱ्या हिंदूंना विचारत आहेत. तुम्ही खरे हिंदू आहात का..? आम्ही हिंदूंचे बाप आहोत, आम्ही हिंदू मालक-यजमान आहोत, आम्ही हिंदू निर्माते आहोत. तुम्ही सगळे भाड्याचे लोक आहात, आम्हाला विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी संतोष होसमनी म्हणाले, सतीश जारकीहोळी निपाणीत काहीही उलटसुलट बोललेले नाहीत.
आमचे सावकार ठाम राहून जे बोलले ते सत्य आहे. बघतो, येतो, करतो, तिकडे येतो, इकडे येतो असे काय म्हणताय? बेळगावात येऊन सावकारांची ताकद बघा असे सांगत त्यांनी यत्नाळ याना खुले आव्हान दिले. कोणीही येऊन आडवा थांबला तर तो सावकार होत नाही. तुम्ही सावकारांचा एक केसही वाकडा करू शकत नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही भित्र्यांची औलाद नाही, आंबेडकरांची औलाद आहे, अशी गर्जना त्यांनी केली.
एकंदर, सतीश जारकीहोळी यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी आज बेळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना सक्त इशारा दिल्याचे दिसून आले.


Recent Comments