Vijayapura

यत्नाळ – अरुण सिंग भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत!

Share

२०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली गतिमान झाल्या असून स्वतःच्याच पक्षाच्या सरकारविरोधात सातत्याने उलटसुलट विधाने करणाऱ्या आम. बसनगौडा पाटील यत्नाळ यांची भेट भाजप राज्य प्रभारी अरुण सिंग यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील हे सातत्याने आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात प्रतिक्रिया देत असतात. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या पार्श्वभूमीवर भाजप जनसंकल्प यात्रेचे आयोजन करत आहे. आज विजापूर जिल्ह्यातील इंडी परिसरात या जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुणसिंग, खासदार रमेश जिगजीनगी, माजी मंत्री अप्पू पट्टणशेट्टी, माजी आमदार रविकांत पाटील आदींसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र यावेळी आमदार बसनगौडा पाटील यांची अनुपस्थिती होती. विजापुरात अरुणसिंग येणार यामुळे ते अनुपस्थित राहिल्याची चर्चा सुरु होती. त्यांच्या अनुपस्थितिमुळे अरुण सिंग यांचे लक्ष विचलित झाले आणि यत्नाळांच्या अनुपस्थितीमुळे कोणता गैरसमज किंवा गोंधळ होऊ नये यासाठी अरुण सिंग यांनी यत्नाळांची भेट घेतली. यावेळी मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनीही अरुण सिंग यांची भेट घेतली.

भाजप जिल्हाध्यक्ष आर एस पाटील, नगरसेवक प्रेमानंद बिरादार, शिवरुद्र बागलकोट, किरण पाटील राहुल जाधव, कुमसी आदींचीही उपस्थिती होती. यानंतर अरुण सिंग यांनी यत्नाळांची भेट घेत १५ मिनिटे गोपनीय बैठक घेतली. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत माहिती मिळाली नाही. अलीकडेच यत्नाळांच्या विधानाला फारसे महत्व देण्याची गरज नसल्याचे विधान अरुण सिंग यांनी केले होते. मात्र आपल्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या यत्नाळांमुळे थोडे विचलित झालेल्या अरुण सिंग यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चा – उपचर्चा सुरु झाल्या. या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबाबत मात्र कमालीची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 

Tags: