निवडणुका असोत किंवा इतर कोणतेही कार्यक्रम राजकारणी नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात. आज बेळगावमध्ये सांबरा विमानतळावर केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनीही भाजपाला लक्ष्य करत टीकेचा भडीमार केला आहे.
पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून नेत्यांचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवसाचे आयोजन केले जात आहे. वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी केदारनाथला जाऊन माझा वाढदिवस साजरा केला. काहीजण रुग्णालयात जाऊन आपला वाढदिवस साजरा करतात. सिध्दरामय्यांचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा झाला. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून कार्यक्रम आयोजिले जातात. विनय कुलकर्णी यांच्याकडे पक्षाने बेळगाव जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदाची धुरा दिली असल्याचे डीकेशींनी सांगितले.
गुन्हेगार व्यक्ती वाढदिवस साजरे करत असल्याची टीका भाजपने केल्यानंतर यावर पलटवार करताना दिकेशी म्हणाले,भाजप नेहमीच बलशाली विरोधकांना घाबरतो आणि आपल्यापेक्षा ताकदवान विरोधकांना घाबरून त्यांच्यावर खोटे गुन्हे, तक्रारी दाखल करण्यात येतात, हे भाजपचे राजकारणाचे तंत्र असल्याची टीका त्यांनी केली. विनय कुलकर्णी यांना धारवाडमध्ये कार्यक्रम करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. विनय कुलकर्णी यांच्यावर राजकीय हेतूने षड्यंत्र रचण्यात आले असून भाजपने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. आणि सध्या सीबीआय कशा पद्धतीने काम करत आहे हे सांगण्याची गरज नसल्याचा टोला डीकेशींनी लगावला. शिवाय विनय कुलकर्णी यांचा बी फॉर्म देखील सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ऊर्जामंत्रीपदी कार्यरत असताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचे आपण स्वागत करत असल्याचे डीकेशींनी सांगितले. आम्ही डोळे आणि तोंड बंद ठेवले नसून भाजप सरकारमधील ऊर्जा मंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी कशापद्धतीने कंत्राट दिली आहेत हे सर्वांना माहित असल्याचेही ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातच या साऱ्या प्रकारांची माहिती मिळेल, आपण तोंड आणि डोळे मिटून राजकारण करत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
जनार्धन रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. जनार्धन रेड्डी यांच्याशी आपण संपर्क साधला नसून इतर अनेक जणांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे डीकेशी म्हणाले. अनेकांनी काँग्रेसकडे अर्ज केला असून लवकरच आपण यादी जाहीर करणार असल्याची माहिती डीकेशींनी दिली.


Recent Comments