Belagavi

बेळगाव हाफ मॅरेथॉनने प्रस्थापित केले नवे मानदंड !

Share

बेळगावात रविवारी पहाटे झालेल्या पाचव्या बेळगाव हाफ मॅरेथॉनमध्ये अनेक नवीन मानदंड प्रस्थापित झाले. या मॅरेथानला बेळगावसह कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून आलेल्या धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेळगावातील गोल्फ प्रॅक्टिस रेंजच्या मैदानावरून ध्वजांकित करण्यात आलेली हाफ मॅरेथॉनची ही आवृत्ती एआयएमएस अर्थात (असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसीस) या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रमाणित केली आहे. बीएचएम हे लेकव्ह्यू फाऊंडेशनद्वारे एक धर्मादाय उपक्रम म्हणून आयोजित केले जाते ज्यात रेस व्यवस्थापन भागीदार यु टू कॅन रन (YouTooCanRun) होते.

शीर्षक प्रायोजक (टायटल स्पॉन्सर्स) केएमएफ नंदिनी होते आणि कार्यक्रम वायव्य लॅब्सद्वारे प्रायोजित होता. स्नेहम इंटरनॅशनल आणि टायटन हे 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि टायटन स्मार्ट घड्याळे यांचे प्रायोजक होते.

या स्पर्धेमध्ये 21K हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा तीन अंतराच्या श्रेणी होत्या. मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या सक्रिय सहकार्याने आयोजित, मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे स्टेशन कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, सीआरपीएफचे डीआयजी रवींद्रन, ब्रिगेडियर दयालन आणि निराणी शुगर्सचे एमडी संगमेश निराणी यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला चालना दिली. या कार्यक्रमात कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून आलेल्या एकूण १२०० स्पर्धक सर्व शर्यतींमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी सुमारे 35% स्पर्धक महिला होत्या. अनेक स्पर्धकांनी चांगल्या आरोग्यासाठी प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

सर्वात वयोवृद्ध सहभागी स्पर्धक बेंगळुरूचे जनार्दन होते, जे 90 वर्षांचे तरुण आहेत आणि त्यांनी 21 किमी धावणे यशस्वीरित्या पूर्ण केली. इंटरनॅशनल अॅक्रिडिएशनमुळे या इव्हेंटमधून पुढील स्तरावर पोहोचवलं जातं. म्हणजेच बेळगाव हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन पात्र झालेल्याना इतर शहरांमध्ये प्रवास न करता त्यांच्या आवडीच्या आंतरराष्ट्रीय रनिंग इव्हेंटमध्ये थेट सहभागी होता येते.

ऑलिम्पिक (अँटवर्प ऑलिंपिक 1920) मध्ये भाग घेणारे पहिले भारतीय मॅरेथॉनपटू आणि बेळगावचे नागरिक असलेले पी. डी. चौगुले यांच्या सन्मानार्थ पुरुष गटातील हाफ मॅरेथॉन विजेत्यासाठी “पी. डी. चौगुले चषक” सादर करण्यात आला. या वर्षीचा चषक विजेता मोहम्मद साहिल अन्नीगेरी ठरला. ज्याला टायटन स्मार्ट घड्याळासह स्नेहम इंटरनॅशनलद्वारे प्रायोजित रु. 50,000/- चे रोख पारितोषिक मिळाले.

त्याचप्रमाणे, महिला वर्गासाठी, चषकाला “कित्तूर राणी चन्नम्मा चषक” असे नाव देण्यात आले आहे आणि 50,000 रुपये रोख आणि टायटन स्मार्ट घड्याळ देखील आहे. प्रीणू यादव ही महिला गटात विजेती ठरली.

ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, केएमएफचे एमडी श्रीनिवास, स्नेहम इंटरनॅशनलचे एमडी अनिश मेत्राणी, लेक व्ह्यूचे डॉ. शशिकांत कुलगोड आणि डॉ गिरीश सोनवलकर या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. एमएलआयआरसीच्या घोड्यांनी हाफ मॅरेथॉन शर्यतीचे नेतृत्व करून कार्यक्रमाला वेगळीच शान आणली.

या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींचा समावेश करण्यासाठी माहेश्वरी अंध शाळेतील मुलांसाठी विशेष मनोरंजक धाव आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 25 अंध विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मॅरेथान पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना मेडल्स, ई सर्टिफिकेट, डिजिटल स्प्लिट टाइम्स, हॉट ब्रेकफास्ट तसेच रूट सपोर्ट देण्यात आला.

Tags:

belgaum half marathon