Belagavi

हुक्केरी हिरेमठाच्या पुरणपोळीसाठी मोठी गर्दी!

Share

बेळगावमध्ये राज्योत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आज हुक्केरी हिरेमठाच्या वतीने पुरणपोळीच्या जेवणाचा बेत आखण्यात आला होता. या पुरणपोळीची चव चाखण्यासाठी लाखोंच्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती.

बेळगावमध्ये साजऱ्या होणाऱ्या ६७ व्या राज्योत्सव दिनानिमित्त, राज्योत्सव उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता. पुरणपोळीची चव चाखण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने नागरिकांची रीघ सरदार मैदानावर दिसून आली.

दरवर्षी राज्योत्सवाच्या निमित्ताने हुक्केरी हिरेमठातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात येते मात्र यंदा चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखाली पुरणपोळीचा बेत आखण्यात आला होता. गेल्या २ दिवसांपासून या मेजवानीची तयारी करण्यात येत होती. आज सरदार मैदानावर लाख पुराणपोळ्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री गोविंद कारजोळ बोलताना म्हणाले, तुकड्यांमध्ये विभागल्या गेलेल्या कर्नाटकाला एक राज्य बनविण्यासाठी कर्नाटक एकीकरण चळवळ उभारण्यात आली. या चळवळीत योगदान दिलेल्या प्रत्येकाचे आपण स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. आज राज्योत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांना पुरणपोळीची मेजवानी हुक्केरी हिरेमठातर्फे आयोजित करून दिल्याबद्दल त्यांनी या कार्याचे कौतुक केले.

या मिरवणुकीचे आकर्षण ठरलेले अभिनेते साईकुमार बोलताना म्हणाले, आपली मातृभाषा तेलगू आहे. मात्र आपल्या जीवनात आपण कन्नड भाषेचा अधिक वापर केला आहे. आपल्याला सिंह म्हणून कन्नड भाषिकांनी गौरविले. मात्र आपण कन्नड भाषिकांनी दिलेल्या या गौरवामुळेच सिंह बनू शकलो असे सांगत त्यांनी अग्नी या चित्रपटातील डायलॉग बोलून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमास खासदार मंगला अंगडी, उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, एसपी डॉ. संजीव पाटील, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags:

belagavi-sweet-dish-from-hukkeri-hiremath/