भाषिक प्रांत रचनेत बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीच्या नेतृत्वाखाली लाखो मराठी भाषिक गेली ६७ वर्षे १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळतात. हाच काळा दिन पाळण्यात येऊ नये यासाठी करवेने धमकीसत्र सुरु केले असून उद्या काळा दिन पाळल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा दिलाय.
करवे शिवरामगौडा गटाच्या उत्तर कर्नाटकाच्या महांतेश रनगट्टीमठ या अध्यक्ष महोदयांनी सदर इशारा दिला आहे. बेळगाव हा कर्नाटकाच्या अविभाज्य घटक असल्याचे सांगत महाजन अहवालानुसार बेळगाव हा कर्नाटकाचाच भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देत असून राज्योत्सवाच्या दरम्यान काळा दिन पाळण्यात येऊ नये असा इशारा त्यांनी दिलाय.

१ नोव्हेंबर हा कर्नाटक वासियांचा उत्सव आहे. या उत्सवात महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन म्हणून निषेध मोर्चा काढून आपल्यावरील अन्यायाचा निषेध करते. शिवाय यंदाचा काळा दिन साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी नाही दिली तरी काळा दिन पाळणारच असा निर्धार समितीने केला आहे. हा निर्धार पाहून करवे च्या अध्यक्षमहोदयांनी समितीलाच हद्दपार करण्याची मागणी करत उद्या काळा दिन पाळण्यात आल्यास समितीसह सर्व मराठी भाषिकांना तडीपार करण्याचा इशाराही दिलाय.
करवे चे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकोडी यांनीही काळ्या दिनासंदर्भात आपले मत व्यक्त केले असून कर्नाटक राज्योत्सवांदरम्यान काळा दिन पाळणाऱ्या समितीला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. काळ्यादिनासंदर्भात प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी चालेल परंतु आपण काळा दिन पाळणारच असा पवित्रा घेतलेल्या समिती नेत्यांनी प्रशासनाने आपल्याला थांबवून दाखवावेच असे आव्हान दिले असून या आव्हानावर प्रशासनाऐवजी करवेचे पदाधिकारी मात्र तापले आहेत.
गेली ६७ वर्षे संयुक्त महाराष्ट्रासाठी न्याय्य मार्गाने आपला लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला उद्याचा काळा दिन न पाळण्याचा इशारा कन्नड संघटनांनी दिला आहे. उद्या समितीच्या काळ्या दिनाच्या आंदोलनानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवा असा इशाराही कन्नड संघटना आणि या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


Recent Comments