Belagavi

नागालँड राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बेळगावच्या अतुल शिरोळेची निवड

Share

नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बेळगावच्या अतुल शिरोळे या कुस्तीपटूची निवड झाल्याने बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथील कुस्तीपटू अतुल सुरेश शिरोळे या कुस्तीपटूने आतापर्यंत कुस्तीमध्ये एकापाठोपाठ एक यश मिळवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. आजपर्यंत अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेऊन या कुस्तीपटूने आपली क्षमता सिद्ध केली असून आता नागालँड येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी त्याने जोरदार तयारी सुरु केली आहे. अतुल शिरोळे याची नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होऊन बेळगावची कीर्ती वाढवली आहे.

घरची परिस्थिती बिकट असूनही कुस्तीच्या क्षेत्रात काहीतरी साध्य करण्याचे स्वप्न पाहणारा अतुल शिरोळे पहाटे ४ वाजता उठून कसोशीने सराव करतो. पुरेशा सोयी सुविधा नसताना स्वतःच्या बळावर अतुल ला कुस्तीमध्ये नवा इतिहास लिहायचा आहे. याबाबत अतुल शिरोळे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि, २०१६ मध्ये रशिया येथील जॉर्जियामध्ये कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले होते. त्यानंतर २०१७ मध्ये तुर्कस्थान येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये ५वा क्रमांक तर २०१९ मध्ये दक्षिण कोरिया येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर आणि यासारख्या अनेक मान्यवरांनी आपल्याला आजवर सहकार्य केले आहे. यापुढील काळात आपल्या साऱ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा, असे आवाहन अतुल शिरोळे याने केले.

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर उत्तम कामगिरी केलेल्या अतुल शिरोळे याची निवड नागालँड येथील कुस्ती स्पर्धेसाठी झाली असून या स्पर्धेत उत्तम कामगिरी करून सुवर्णपदक जिंकून राज्याची, राष्ट्राची आणि आपल्या बेळगावची शान वाढवावी हीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्याच्या पुढील कामगिरीसाठी इन न्यूज – आपली मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा !

Tags:

/wrestler-atul-shirole-going-to-particiepate-in-nagaland-wrestling-competitation/