Belagavi

वडगाव-येळ्ळूर रस्त्यावर खड्डे, धुळीचे साम्राज्य

Share

बेळगाव स्मार्ट सिटी होत आहे, असे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणात सांगतात. मात्र प्रत्यक्षात येथील रस्तेच धूळ खात आहेत. खड्ड्यांची भरलेल्या रस्त्यावरून चालताना लोकांना त्रास होत आहे. यामुळे रहिवासी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नावे बोटे मोडत आहेत.

होय, अर्धवट खोदलेला रस्ता, रस्त्यावर मोठमोठे खड्डे, हा रस्ता आहे की धुळीचे साम्राज्य..? अशाच रस्त्यावरून चालण्याची लोकांवर आलेय वेळ, आम्ही दाखवतोय हा कोणता रस्ता हे तुम्हाला माहीत आहे का? बेळगावातील वडगाव-येळ्ळूर रस्त्यावरील गोंधळाचे हे दृश्य.

दीड वर्षांपूर्वी हा रस्ता खोदून नवा रस्ता तयार करण्याचे आश्वासन देणाऱ्या ठेकेदाराने इकडे पुन्हा डोळे फिरवले नसल्याचे दिसून येत आहे. या अपूर्ण कामामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना धुळीत चालण्याचा नरक यातना सहन करावा लागत आहे. तसेच खड्डे वाढल्याने अनेक दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला आहे. याबाबत रवींद्र काकतीकर नावाच्या रहिवाशाने आपली मराठीशी बोलताना, आमचे येथे दागिन्यांचे दुकान असल्याचे सांगितले. ठेकेदाराने येथे रस्ता तयार केला नाही. त्यामुळे भरपूर धूळ निर्माण होते. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. अति धुळीमुळे सर्दी, खोकला, घशाचा त्रास होत आहे. कृपया हा प्रश्न सोडवा, अशी विनंती त्यांनी केली.

येथील आणखी एक ज्येष्ठ रहिवासी निट्टूरकर म्हणाले की, रस्त्याचे खोदकाम करून डांबरीकरण होणे बाकी आहे. आता कसाही पावसाळा संपला आहे. किमान आता तरी या रस्त्याची दुरुस्ती करावी. धूळ आणि खड्डे निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण होत आहेत. ठेकेदाराने काम अर्धवट सोडले आहे. आम्हाला नगरसेवक असूनही नसल्यासारखी परिस्थिती आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

एकंदरीत बेळगाव स्मार्ट सिटी होत आहे. बेळगाव स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे, असे लोकांना वाटते. मात्र येथील रस्ते, नाल्यांचे प्रश्न सुटत नाहीत. लोकांचा त्रास टाळण्यासाठी येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी पुढे येतील का, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags:

vadgaon yallur road problem