Vijayapura

विजापुरात मनपा निवडणुकीत टक्केवारी घसरली!

Share

विजापूर महानगरपालिकेच्या निवडणुका काल पार पडल्या. मात्र या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी मतदान झाले असून निवडणूक प्रक्रियेत मतदारांची उदासीनता पाहायला मिळाली आहे. इतकेच नाही तर ज्या प्रभागात सर्वाधिक मतदान होण्याची शक्यता होती त्याच प्रभागात मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र दिसून आले आहे. विजापूर मनपा निवडणुकीसंदर्भात आमचे प्रतिनिधी विजयकुमार सारवाड यांनी घेतलेला आढावा पाहुयात या रिपोर्टमधून.

शुक्रवारी विजापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतप्रक्रिया सुरु होती. ३५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केवळ ५५.१५ टक्के मतदान झाले असून एकूण २,८७,९२७ मतदारांपैकी केवळ १,५९,०७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. यापैकी १,४३,३२९ पुरुष मतदारांपैकी ८२,०४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविलाय तर १,४४,४९८ महिला मतदारांपैकी ७७,०२५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविलाय.

तर इतर १०० मतदारांपैकी एकानेही मतदानाचा हक्क बजाविला नाही. ज्या प्रभागात सर्वाधिक साक्षर आणि सुज्ञ नागरिक राहतात अशा प्रभाग क्रमांक ५ मध्ये केवळ ४४ टक्के मतदानाचा हक्क मतदारांनी बजाविला आहे. तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक ७६ टक्के मतदान झाले आहे. मतदारांच्या यादीतील बहुतांशी नावे वगळण्यात आल्याने निवडणुकीचा उत्साह कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यान हि बाब लक्षात येताच वि प सदस्य सुनीलगौडा पाटील यांनी निवडणूक स्थगित करण्याची मागणीही केली आहे.

अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याची बाब आम. बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्याही निदर्शनात आली असून त्यांनीही जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. मतदारांनी गोंधळ करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. काही मतदारांची नावे दोन – तीन ठिकाणी मतदार यादीत आहेत. त्यांची नावे एकाच ठिकाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. तर काहींची नावे मतदारयादीतून गायब झाली आहेत. यासंदर्भात तहसीलदार आणि जिल्हा प्रशासन पडताळणी करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये रवाना करण्यात आल्या असून यासाठी कडेकोट सुरक्षाही पुरविण्यात आली आहे. विजापूर शहरातील दरबार हायस्कुल मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये या मशीन ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणीकडे उमेदवार आणि नागरिकांच्या नजरा उत्सुकतेने खिळल्या आहेत.

Tags: